गतिमंद मुलासोबत आयुष्याशी झुंजताना आधार दिलाय तो वृत्तपत्रानं..
By : प्रशांत चुयेकर
कोल्हापूर : आभाळच फाटलंय, त्याला किती ठिगळं जोडणार? कुंकवाचा धनी देवाघरी गेला. डोक्यावर धड छप्पर नाही, की सुरक्षित भविष्याची शाश्वती नाही. गतिमंद मुलासोबत आयुष्याशी झुंजताना आधार दिलाय तो वृत्तपत्रानं..
कोणाचेही डोळे पाणावणारी, कोल्हापुरातील सुबराव गवळी तालीम, मंगळवार पेठेतील सुवर्णा सुदन तगारे यांची ही कहाणी आहे. उत्पन्नाचे काही साधन नसताना केवळ पेपर विक्रीने त्यांना आधार दिला आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा या काव्यपंक्तीप्रमाणे थेट कृतीतूननच धडा गिरवत समाजासमोर तगारे यांनी आदर्श निर्माण केला आहे.
रोज पहाटे चार वाजता सुरु झालेला त्यांचा कष्टमय प्रवास रात्री ८ वाजता थांबतो. पेपर विक्री आणि पानपट्टीच्या जीवावर त्यांनी कुटुंबाचा गाडा पुढे सुरु ठेवला आहे. दोन महिन्यापूर्वी पतीचे नियन सुवर्णा तगारे यांचे पती सुदन तगारे यांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय होता. त्याच ठिकाणी त्यांनी पानपट्टीडी सुरु केली होती. ४५ वर्ष त्यांनी हा व्यवसाय नेटाने केला.
त्यानंतर सर्वकाही सुरळीत चालत होते. त्याच वेळी सुदन तगारे यांचे निधन झाले. गतिमंद मुलाला सोबत घेत कसं जगायचं असा प्रश्न तगारे यांच्यासमोर पडला होता. पती असतानाच तगारे यांनी अंक विक्रीचा व्यवसायाबाबत माहिती करून घेतली होती. त्याचा आज फायदा होत असल्याचेही तगारे यांनी यावेळी सांगितले. घराघरात जाऊन पहाटे पेपरचे वाटप पती सुदन तगारे यांचे निधन झाल्यानंतर सुवर्णा तगारे यांना काय करावे हे सुचत नव्हते.
अखेर पती सुदन तगारे यांनी सुरू केलेला वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्धार केला. महिला असूनही पहाटे भाउसिंगजी रोडवरील सर्व दैनिकांच्या अंकविक्री केंद्रावर जाऊन वृत्तपत्रांची खरेदी त्या करतात. दिडशेहून अधिक वृत्तपत्राची त्या विक्री करतात. गतिमंद मुलाच्या मदतीने त्या अनेक घरातही वृत्तपत्र वाटायचे काम करतात. तरीही प्रतिकूल परिस्थितीला न घाबरता आयुष्याच्या सुवर्ण योगाची आतुरतेने वाट बघत त्यांनी आपला कष्टमय प्रवास सुरु ठेवला आहे.
परिस्थितीने पायावर उभं रहायला शिकवलं…
पानपट्टीवर विविध मासिकं, वर्तमानपत्रं तगारे विकतात. डिजिटल युगात लोक वाचयचे कमी आलेत तरीही, मी अंक विकते…. कारण मला झगडायचंय. माघार नाही, असं त्या ठामपणे सांगतात. तगारे यांना दररोज संघर्ष करावा लागत आहे, स्वतःच पुढाकार घेत गतिमंद मुलाला सांभाळायचे आहे. परिस्थितीने पायावर उभं राहायला शिकवलं की सावली मागं लागते या जाणिवेने त्यांचा संघर्ष इतरासमोर कायम आदर्श राहिल.








