सांगलीत नवविवाहितेची आत्महत्या कारण अस्पष्ट ; विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल
सांगली: विश्रामबाग परिसरातील वान्लेसवाडी येथे राहणाऱ्या नवविवाहितेने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. प्रज्ञा पटलोबा दहीफळे (वय 22) असे त्या विवाहितेचे नाव आहे. त्यांचे पती पोलीस दलातील मोटार परिवहन विभागात कार्यरत आहेत.
प्रज्ञा यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दहीफळे कुटुंबीय मूळचे लातूर येथील आहेत. पटलोबा दहीफळे हे काही वर्षांपूर्वी सांगली पोलीस दलात भरती झाले.
मोटार परिवहन विभागात ते चालक म्हणून कार्यरत आहेत. दहीफळे यांचा काही वर्षांपूर्वी प्रज्ञा यांच्याशी विवाह झाला होता. ते वान्लेसवाडी येथील पाटील मळा परिसरात राहण्यास आहेत. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास प्रज्ञा यांनी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, विश्रामबाग पोलिसांना याबाबत माहित मिळाल्यानंतर घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.आत्महत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट नसून पोलीस अधिक तपास करत आहे. येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.








