रस्त्यांच्या बाजूला वाढलेल्या झुडुपांची चतुर्थीपूर्वी छाटणी करण्याकडे लक्ष
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण मतदारसंघातील नवनिर्वाचित पंचायत सदस्यांनी आपापल्या वॉर्डातील कामांकडे गंभीरपणे लक्ष द्यायला सुरुवात केली असून गणेश चतुर्थी सणाचे निमित्त धरून वॉर्डातील रस्त्याच्या बाजूच्या सफाईच्या कामात झोकून दिले आहे. बहुतेक पंचांनी स्वखर्चाने ही कामे करून घेतली असून स्थानिक समर्थक, कार्यकर्त्यांनी याकामी मोलाचे सहकार्य केले आहे, अशी माहिती काही पंचांनी दिली.
आगोंद पंचायतीच्या सरपंच फातिमा रॉड्रिग्स यांनी आपल्या वॉर्डातील काही कार्यकर्ते तसेच पंच यांच्या सहकार्याने प्रत्येक वॉर्डातील रस्त्याच्या बाजूची झुडुपे हटवून सफाई केली आहे. तर लोलये पंचायतीत पंच अजय लोलयेकर, सचिन नाईक, सरपंच प्रतिजा बांदेकर यांनी आपापल्या वॉर्डातील सफाईच्या कामांना सुरुवात केली आहे. पैंगीण पंचायतीच्या सरपंच सविता तवडकर यांनी उपसरपंच सुनील पैंगणकर आणि आपल्या उर्वरित मंडळाला बरोबर घेऊन महालवाडा येथे आपत्कालीन सेवेसाठी उभारण्यात आलेल्या आसरास्थळाच्या इमारतीची पाहणी केली आणि काही महत्त्वाच्या सूचना केल्या. हत्तीपावल या ठिकाणी उभारलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला या मंडळाने सचिव राजीव ना. गावकर यांच्यासमवेत भेट देऊन पाहणी केली.
वेलवाडा वॉर्डाचे पंच सतीश पैंगीणकर यांनी आपल्या वॉर्डातील रस्त्याच्या बाजूच्या झाडांची छाटणी केली आहे. याकामी त्यांना वॉर्डातील प्रशांत गडो, गजानन सुदिर, सुभाष नाईक, नंदा पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. गणेश चतुर्थीच्या सणाला गावाबाहेर असलेले स्थानिक लोक आवर्जुन येत असतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हमरस्ता त्याचबरोबर अंतर्गत मार्गांची यावेळी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सफाई करण्यात आली.
मार्ली वॉर्डाच्या पंच रसिका गावकर यांनी चिपळे येथील रस्त्याच्या बाजूची सफाई करून घेतली आहे. यावेळी माजी पंच दुमिंग मोंतेरो, ज्योकी आफोंस, सुरेंद्र गोसावी, उल्हास नाईक, संतोष सुदिर आणि अन्य कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या बाजूची धोकादायक झुडुपे हटवून रस्त्याची सफाई केली. या मतदारसंघातील अन्य पंचायतींमधील पंचही सक्रिय झालेले असून गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यांच्या बाजूची सफाई करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.









