जेकॉब डफी ‘सामनावीर’, मिचेल, ब्रेसवेल यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / माऊंट माँगेनेयु
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शनिवारी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात सुरेश यजमान न्यूझीलंडने श्रीलंकेचा 8 धावांनी निसटता पराभव केला. या सामन्यात 21 धावांत 3 गडी बाद करणाऱ्या जेकॉब डफीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 8 बाद 172 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 20 षटकात 8 बाद 164 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 8 धावांनी गमवावा लागला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये मिचेलने 42 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 62, मिचेल ब्रेसवेलने 33 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 59, चॅपमनने 13 चेंडूत 1 चौकारासह 15, रॉबीनसनने 9 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 6 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे बिनुरा फर्नांडो आणि महेश तिक्ष्णा तसेच हसरंगा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. पथीरणाने 60 धावांत 1 बळी मिळविला. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 32 धावा जमविताना 2 गडी गमविले. न्यूझीलंडचे अर्धशतक 49 चेंडूत, शतक 86 चेंडूत तर दीड शतक 110 चेंडूत नोंदविले गेले. मिचेलने 35 चेंडूत तर ब्रेसवेलने 28 चेंडूत अर्धशतक झळकविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात सलामीच्या निशांकाने 60 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 90 तर कुशल मेंडीसने 36 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 46 धावा जममविल्या. या जोडीने 13.3 षटकात 121 धावांची शतकी भागिदारी केली. त्यानंतर न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचे 7 गडी 43 धावांत तंबूत परतले. लंकेच्या डावात 4 षटकार आणि 16 चौकर नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे डफीने 21 धावांत 3 तर मॅक हेन्री आणि फोकेस यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 56 धावा जमविल्या. त्यांचे अर्धशतक 33 चेंडूत तर शतक 67 चेंडूत आाणि दीड शतक 108 चेंडूत नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड 20 षटकांत 8 बाद 172 (मिचेल 62, ब्रेसवेल 59, कॅपमन 15, रॉबीनसन 11, अवांतर 7, बिनुरा फर्नांडो, महेश तिक्ष्णा आणि हसरंगा प्रत्येकी 2 बळी. पतीरणा 1-60), लंका 20 षटकात 8 बाद 164 (निशांका 90, कुशल मेंडीस 46, अवांतर 7, डफी 3-21, हेन्री 2-28, फोकेस 2-41)









