वृत्तसंस्था/ ड्युनेडीन
रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान न्यूझीलंडने बांगलादेशचा 39 धावांनी पराभव करत या मालिकेत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडतर्फे शतक झळकवणाऱ्या सलामीच्या विल यंगला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे न्यूझीलंडने 30 षटकात 7 बाद 239 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 30 षटकात 9 बाद 200 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 39 धावांनी गमवावा लागला.
खराब हवामान आणि किरकोळ पावसामुळे हा सामना पंचांनी प्रत्येकी 30 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या यंगने 84 चेंडूत 4 षटकार आणि 14 चौकारांसह 105 धावा झळकाविल्या. तर कर्णधार लॅथमने 77 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 92 धावांची खेळी केली. यंग आणि लॅथम यांनी तिसऱ्या गड्यासाठी 171 धावांची शतकी भागिदारी केली. न्यूझीलंडच्या डावामध्ये केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. लॅथमचे शतक 8 धावांनी हुकले. चॅपमनने 11 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमविल्या. न्यूझीलंडचे इतर फलंदाज लवकर बाद झाले. बांगलादेशने आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर न्यूझीलंडचे 4 फलंदाज धावचीत केले. बांगलादेशतर्फे शोरिफूल इस्लामने 28 धावात 2 तर मेहदी हसन मिराझने 53 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशने 30 षटकात 9 बाद 200 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशच्या डावात अनामुल हकने 39 चेंडूत 5 चौकारांसह 43, लिटन दासने 1 षटकार आणि 1 चौकारासह 22, कर्णधार नजमूल हुसेन शांतोने 2 चौकारांसह 15, रिदॉयने 27 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 33, मेहदी हसन मिराझने 21 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 28, अफिफ हुसेनने 28 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 38 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 5 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे मिलेनी, सोधी आणि क्लार्कसन यांनी प्रत्येकी 2 तसेच डफी, ओरुकी आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 30 षटकात 7 बाद 239 (यंग 105, लॅथम 92, चॅपमन 20, अवांतर 19, एस. इस्लाम 2-28, मेहदी हसन मिराझ 1-53), बांगलादेश 30 षटकात 9 बाद 200 (अनाम उल हक 43, शांतो 15, दास 22, रिदॉय 33, अफिफ हुसेन 38, मेहदी हसन मिराझ 28, अवांतर 8, क्लार्कसन 2-24, सोधी 2-35, मिल्ने 2-46, ओरुकी 1-35, रचिन रविंद्र 1-20).









