वृत्तसंस्था/ ऑकलंड
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शनिवारी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने लंकेचा 198 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. 31 धावात 5 गडी बाद करणाऱ्या न्यूझीलंडच्या हेन्री सिप्लेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यामध्ये लंकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडचा डाव 49.3 षटकात 274 धावांवर आटोपला. लंकेला विजयासाठी त्यांनी 275 धावांचे आव्हान दिले. पण सिप्ले, मिचेल आणि टिकनेर यांच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव 19.5 षटकात 76 धावात आटोपल्याने न्यूझीलंडने हा सामना 198 धावांनी जिंकला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या अॅलनने 49 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 51, बोवेसने 15 चेंडूत 2 चौकारांसह 14, यंगने 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26, डॅरील मिचेलने 58 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 47 धावा जमविल्या. कर्णधार लॅथम 5 धावांवर बाद झाला. फिलिप्सने 42 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 39 तर रचिन रविंद्रने 52 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 49 धावा झळकविल्या. सोधीने 10 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 8 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे करुणारत्नेने 43 धावात 4, रजिताने 38 धावात 2, कुमाराने 46 धावात 2, मधुशंकाने 58 धावात 1 तर शनाकाने 16 धावात 1 गडी बाद केला. न्यूझीलंडच्या अॅलनचे वनडे क्रिकेटमधील हे पाचवे अर्धशतक आहे. न्यूझीलंडकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रचिन रविंद्रचे पहिले अर्धशतक केवळ एका धावेने हुकले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सिप्लेच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव केवळ 19.5 षटकात आटोपला. लंकेच्या केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. मॅथ्यूजने 3 चौकारांसह 18, करुणारत्नेने 1 चौकारासह 11 तर कुमाराने 1 षटकार आणि 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. वनडे क्रिकेटमधील लंकेची ही पाचव्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या आहे. लंकेने आपले पहिले दोन गडी 14 धावांवर तर तिसरा गडी 20, तसेच चौथा आणि पाचवा गडी 31 धावांवर गमविले. पहिल्या 10 षटकातच त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला होता. आता उभय संघातील दुसरा सामना ख्राईस्टचर्च येथे येत्या मंगळवारी तर शेवटचा वनडे सामना हॅमिल्टन येथे येत्या शुक्रवारी खेळविला जाईल. या वनडे मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. लंकेला या दौऱ्यात न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत 0-2 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला आहे. चालू वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसीच्या वनडे चषक क्रिकेट स्पर्धेत थेट प्रवेशासाठी लंकेला या मालिकेतील सर्व म्हणजे तिन्ही सामने जिंकणे जरुरीचे आहे. न्यूझीलंडने यापूर्वीच भारतातील होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 49.3 षटकात सर्वबाद 274 (अॅलन 51, बोवेस 14, यंग 26, मिचेल 47, फिलिप्स 39, रचिन रविंद्र 49, लॅथम 5, सिप्ले 6, सोधी 10, करुणारत्ने 4-43, रजिता 2-38, कुमारा 2-46, मधुशंका 1-58, शनाका 1-16), लंका 19.5 षटकात सर्वबाद 76 (मॅथ्यूज 18, करुणारत्ने 11, कुमारा 10, सिप्ले 5-31, मिचेल 2-12, टिकनेर 2-20).









