वृत्तसंस्था/ ईस्ट लंडन
19 वर्षाखालील वयोगटाच्या आयसीसी पुरूषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या ड गटातील सामन्यात न्यूझीलंडने नेपाळचा 64 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात न्यूझीलंडच्या स्नेहीत रेड्डीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने 50 षटकात 8 बाद 302 धावा जमवून नेपाळला विजयासाठी 303 धावांचे कठीण आव्हान दिले. पण नेपाळला 50 षटकात 9 बाद 238 धावांपर्यंत मजल मारता आल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये स्नेहीत रेड्डीने 125 चेंडूत 6 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 147 धावा झळकविल्या. कर्णधार ऑस्कर जॅकसनने 81 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह 75, टॉम जोन्सने 45 चेंडूत 5 चौकारांसह 33, वॅटसनने 2 चौकारांसह 14, थॉमसनने 1 षटकारासह 13 धावा जमविल्या. रेड्डी आणि जॅकसन यांनी चौथ्या गड्यासाठी 157 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडच्या डावात 12 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. नेपाळतर्फे सुभाष भंडारीने 3 तर गुलशन झाने 2 तसेच दिपेश केंडल, तिलक भंडारी आणि आकाश त्रिपाठी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नेपाळच्या डावात सलामीच्या अर्जुन कुमालने 104 चेंडूत 12 चौकारांसह 90, कर्णधार देव खेनालने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 36, बोहराने 2 चौकारांसह 15, आकाश चंदने 1 चौकारासह 14, सुभाष भंडारीने 4 चौकारांसह नाबाद 33, तिलक भंडारीने 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 17 धावा जमविल्या. नेपाळच्या डावात 29 अवांतर धावा मिळाल्या. नेपाळच्या डावामध्ये 2 षटकार आणि 26 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे मॅसन क्लार्कने 25 धावात 3, स्क्रेडेर आणि ऑस्कर जॅकसन यांनी प्रत्येकी 2, मॅट रो आणि कमिंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड 50 षटकात 8 बाद 302 (स्नेहीत रे•ाr 147, जॅकसन 75, जोन्स 33, वॅटसन 14, थॉमसन 13, सुभाष भंडारी 3-60, गुलशन झा 2-61, दिपेश केंडल, तिलक भंडारी, आकाश त्रिपाठी प्रत्येकी 1 बळी), नेपाळ 50 षटकात 9 बाद 238 (अर्जुन कुमाल 90, देव खेनाल 36, बोहरा 15, सुभाष भंडारी नाबाद 33, तिलक भंडारी नाबाद 17, आकाश चंद 14, अवांतर 29, क्लार्क 3-25, स्क्रेडेर 2-54, जॅकसन 2-25, रो 1-47, कमिंग 1-39).









