बांगलादेशवर 8 गडी राखून विजय : कर्णधार केन विल्यम्सन, डॅरेल मिचेलची शानदार अर्धशतके
वृत्तसंस्था/ चेन्नई
आयसीसी वर्ल्डकपमध्ये येथील एम चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या लढतीत न्यूझीलंडने बांगलादेशवर 8 गडी राखून विजय मिळवला. वर्ल्डकपमधील न्यूझीलंडचा हा सलग तिसरा विजय असून गुणतालिकेत सहा गुणासह त्यांनी पुन्हा अव्वलस्थानी झेप घेतली आहे. बांगलादेशने 50 षटकांत 9 गडी गमावत 248 धावा केल्या. यानंतर किवीज संघाने विजयी लक्ष्य 42.5 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. 49 धावांत 3 बळी घेणाऱ्या लॉकी फर्ग्युसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रारंभी, बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 246 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवीज संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रचिन रविंद्र 9 धावांवर बाद झाला. यानंतर कॉनवे व कर्णधार विल्यम्सन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी साकारली. कॉनवेने 3 चौकारासह 45 धावा जमवल्या. पण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याला मुस्तफिजूर रेहमानने बाद केले. यानंतर विल्यम्सन व डॅरेल मिचेल यांनी तिसऱ्या गड्यासाठी 108 धावांची भागीदारी साकारत संघाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. विल्यम्सनने दीर्घ कालावधीनंतर अर्धशतकी खेळी साकारताना 107 चेंडूत 8 चौकार व 1 षटकारासह 78 धावा फटकावल्या. पुन्हा दुखापत झाल्याने तो रिटायर्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला तर मिचेलने अवघ्या 67 चेंडूत 6 चौकार व 4 षटकारासह नाबाद 89 धावांची खेळी साकारली. किवीज संघाने विजयी आव्हान 42.5 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. ग्लेन फिलिप्स 16 धावांवर नाबाद राहिला.
मुशफिकुर रहीमची अर्धशतकी खेळी वाया
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशच्या संघाची सुरुवात खराब झाली. इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टने बांगलादेशच्या लिटन दासला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर तांजिद हसन (16) व मेहंदी हसन मिराज (30) यांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. नजमू शांतोही 7 धावांवर बाद झाल्याने बांगलादेशची 4 बाद 56 अशी स्थिती झाली होती. मात्र, त्यानंतर मुशफिकुर रहीम व कर्णधार शाकीब अल हसन यांनी पाचव्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. रहीमने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 75 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह 66 धावा फटकावल्या तर कर्णधार शकीबने 51 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारासह 40 धावांचे योगदान दिले. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर मेहमुदुल्लाहने 49 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारासह नाबाद 41 धावा करत संघाला 245 धावापर्यंत मजल मारुन दिली. तस्कीन अहमदने 17 धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्सच्या खात्यात एक-एक विकेट जमा झाली.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 50 षटकांत 9 बाद 245 (मेहंदी हसन मिराज 30, शकीब अल हसन 40, मुशफिकूर रहीम 66, मेहमुदुल्लाह नाबाद 41, तस्कीन अहमद 17, लॉकी फर्ग्युसन 49 धावांत 3 बळी, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री प्रत्येकी दोन बळी)
न्यूझीलंड 42.5 षटकांत 2 बाद 248 (डेव्हॉन कॉनवे 45, रचिन रविंद्र 9, केन विल्यम्सन 107 चेंडूत 78, डॅरेल मिचेल 67 चेंडूत नाबाद 89, ग्लेन फिलिप्स नाबाद 16, मुस्तफिजूर रेहमान, शकीब अल हसन प्रत्येकी एक बळी).
ट्रेंट बोल्टचा असाही अनोखा विक्रम, जो कोणत्याही किवीज गोलंदाजाला जमला नाही
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात न्यूझीलंडसाठी पहिले षटक टाकणाऱ्या वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने खास विक्रमाला गवसणी घातली. बोल्टने डावातील पहिल्याच चेंडूवर सलामीवीर लिटन दासची विकेट मिळवली. विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा ट्रेंट बोल्ट हा न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या इतिहासमध्ये न्यूझीलंडच्या कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये बोल्ट डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पहिला किवीज गोलंदाज ठरला आहे. दरम्यान, याआधी क्रेग मॅकडरमॉट, चामिंडा वास, खुर्रम चौहान, शेल्डन कॉट्रेल आणि कागिसो रबाडा या गोलंदाजांनी वर्ल्डकपमध्ये पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला आहे.
वनडेत बोल्टच्या 200 विकेट्स
बांगलादेशविरुद्ध लढतीत किवीज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने 45 धावांत 2 बळी घेतले. यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये त्याने आपल्या 200 विकेट्स देखील पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, बोल्ट वनडे क्रिकेटमध्ये दुसरा सर्वात कमी सामन्यांमध्ये 200 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. अवघ्या 107 व्या वनडे सामन्यात त्याने 200 विकेट्सचा टप्पा पार केला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क याने अवघ्या 102 सामन्यांमध्ये 200 वनडे विकेट्स घेतल्या आहेत. माजी ऑस्ट्रेलिया दिग्गज ब्रेट लीया यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने 112 सामन्यांमध्ये 200 विकेट्सचा टप्पा पार केला होता.









