अफगाणिस्तानवर 149 धावांनी दणदणीत विजय : गुणतालिकेत भारताला मागे टाकत पटकावले अव्वलस्थान
वृत्तसंस्था/ चेन्नई
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा तब्बल 149 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडचा हा वर्ल्डकपमधील सलग चौथा विजय असून 8 गुणासह त्यांनी गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. प्रारंभी, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम व विल यंगच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 50 षटकांत 6 बाद 288 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाण संघाचा डाव 34.4 षटकांत 139 धावांवर आटोपला.
सुरुवातीला सामन्यावर भक्कम पकड मिळवूनही त्यानंतर झालेली सुमार गोलंदाजी, सुमार क्षेत्ररक्षण आणि त्याच्यापेक्षाही केलेल्या बेजबाबदार फलंदाजीमुळे अफगाणिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभवला सामोरे जावे लागले. या विजयासह न्यूझीलंडने गुणतालिकेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, त्यामुळे भारत दुसऱ्या स्थानी घसरला आहे. किवीज संघाचे चार सामन्यात आठ तर भारताचे तीन सामन्यात सहा गुण आहेत. सर्वाधिक 71 धावांची खेळी साकारणाऱ्या न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
सँटेनर, फर्ग्युसनसमोर अफगाण फलंदाजांची नांगी
न्यूझीलंडच्या 289 धावांचा पाठलाग करत असताना अफगाणिस्तानला सुरुवातीपासूनच एकावर एक धक्के बसत गेले. सलामीवीर गुरबाज 11 धावा काढून बाद झाला. यानंतर इब्राहिम झद्रनलाही (14) फारशी चमक दाखवता आली नाही. तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीला आलेल्या रेहमत शाहने सर्वाधिक 1 चौकारासह 36 धावा केल्या तर उमरझाईने 27 धावांचे योगदान दिले. इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. अफगाणिस्तानचे शेवटचे सहा फलंदाज अवघ्या 42 धावांमध्ये गमावल्याने दारुण पराभव झाला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनेर आणि लॉकी फर्ग्युसन यांनी भेदक गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन-तीन गडी बाद केले. त्यांना ट्रेंट बोल्टने दोन गडी बाद करत चांगली साथ दिली. तर मॅट हेन्री आणि रचिन रविंद्र यांनी एक एक विकेट घेत मोलाची भूमिका बजावली.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. 30 धावांवर किवीज संघाने पहिली विकेट गमावली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला 20 धावांवर मुजीब रेहमानने बाद केले. यानंतर विल यंग व रचिन रविंद्र यांनी दुसऱ्या गड्यासाठी 79 धावांची भागीदारी करत संघाचे शतक फलकावर लावले. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना रविंद्रला 32 धावांवर उमरझाईने बाद केले. यानंतर याच षटकांत विल यंगचा त्रिफळा उडवत उमरझाईने अफगाण संघाला तिसरा धक्का दिला. यंगने 64 चेंडूत 54 धावा फटकावल्या. बहरात असलेल्या डॅरेल मिचेलचा अडथळा रशीद खानने दूर केला. मिचेलला केवळ एक धाव काढता आली. यामुळे 1 बाद 109 या स्थितीतून त्यांची 4 बाद 110 अशी स्थिती झाली होती.
लॅथम, फिलिप्सची शानदार अर्धशतके
4 बाद 100 या बिकट स्थितीत सापडलेल्या किवीज संघाला कर्णधार टॉम लॅथम व ग्लेन फिलिप्स यांनी बाहेर काढले या जोडीने पाचव्या गड्यासाठी 144 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली. या जोडीने एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाच्या अडीचशे धावा फलकावर लावल्या. कर्णधार लॅथमने 74 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारासह 68 धावा फटकावल्या तर ग्लेन फिलिप्सने 80 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारासह 71 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर मार्क चॉपमनने शेवटच्या क्षणी 12 चेंडूत नाबाद 25 धावा करत संघाला 6 बाद 288 धावापर्यंत मजल मारुन दिली. मिचेल सँटेनर 7 धावांवर नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक आणि अजमतुल्ला उमरझाईने प्रत्येकी दोन बळी घेतले. राशीद खान आणि मुजीब उर रहमान यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 50 षटकांत 6 बाद 288 (कॉनवे 20, विल यंग 54, रचिन रविंद्र 32, टॉम लॅथम 68, ग्लेन फिलिप्स 71, मार्क चॉपमन नाबाद 25, सँटेनर नाबाद 7, नवीन उल हक व उमरझाई प्रत्येकी दोन बळी).
अफगाणिस्तान 34.4 षटकांत सर्वबाद 139 (गुरबाज 11, इब्राहिम झद्रन 14, रेहमत शाह 36, उमरझाई 27, सँटेनर व फर्ग्युसन प्रत्येकी तीन बळी).
अर्धशतकी खेळीसह विल यंगचा अनोखा विक्रम
अफगाणविरुद्ध सामन्यात न्यूझीलंडच्या विलने जबरदस्त फटकेबाजी करत 57 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात 64 चेंडूत एकूण 54 धावा केल्या. या खेळीसह त्याने आपल्या नावावर खास विक्रम केला. न्यूझीलंडसाठी 2023 या वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विल यंग दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. तो न्यूझीलंडसाठी यावर्षी वनडेत 700 धावांचा टप्पा पार करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने 17 सामन्यात 702 धावा केल्या. यामध्ये 7 अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडसाठी 2023 मध्ये वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज डॅरेल मिचेल आहे. त्याने 790 धावा केल्या आहेत. तसेच, तिस्रया स्थानी डेवॉन कॉनवे असून त्याने 698 धावा केल्या आहेत.









