रुट, ब्रुक यांची दीडशतके, इंग्लंडचा 435 धावांचा डोंगर, न्यूझीलंड प. डाव 7 बाद 138
वृत्तसंस्था / वेलिंग्टन
दुसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीतील शनिवारी खेळाच्या दुसऱया दिवशी इंग्लंडच्या भेदक माऱयासमोर यजमान न्यूझीलंडची पहिल्या डावात घसरगुंडी झाली. इंग्लंडने आपला पहिला डाव 8 बाद 435 धावांवर घोषित केल्यानंतर न्यूझीलंडने दिवसअखेर पहिल्या डावात 7 बाद 138 धावा जमविल्या. इंग्लंडच्या अँडरसन आणि लिच यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. इंग्लंडच्या पहिल्या डावात रुट आणि ब्रुक यांनी दीडशतके झळकविली.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने पहिली कसोटी जिंकून न्यूझीलंडवर आघाडी मिळविली आहे. आता या दुसऱया कसोटीत इंग्लंडची स्थिती शनिवारअखेर अधिक भक्कम झाली आहे. इंग्लंडने 3 बाद 315 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी 8 बाद 435 धावांवर डावाची घोषणा केली. इंग्लंडच्या चार फलंदाजांनी 120 धावांची भर घातली. माजी कर्णधार रुट आणि बुक यांनी चौथ्या गडय़ासाठी 302 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडच्या हेन्रीने बुकला स्वतःच्या गोलंदाजीवर टिपले. त्याने 176 चेंडूत 5 षटकार आणि 24 चौकारांसह 186 धावा झळकविल्या. कर्णधार स्टोक्सने 5 चौकारांसह 27, ब्रॉडने 2 चौकारांसह 14, रॉबिनसनने 1 चौकारासह 18 तर लिचने 1 चौकारासह 6 धावा जमविल्या. रुटने 224 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 153 धावा झळकविल्या. न्यूझीलंडतर्फे हेन्रीने 100 धावात 4 तर ब्रेसवेलने 2 तसेच साऊदी आणि वेग्नर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उपाहारापूर्वीच इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाची घोषणा केली.

अँडरसन आणि लिच यांच्या भेदक माऱयासमोर न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला सुरुवातीपासूनच गळती लागली. उपाहारावेळी न्यूझीलंडने 2 बाद 12 धावा जमविल्या होत्या. अँडरसनने कॉनवेला खाते उघडण्यापूर्वी फोकेसकरवी झेलबाद केले. त्यानंतर अँडरसनने न्यूझीलंडला आणखी एक धक्का देताना विलियमसनला बाद केले. सलामीच्या लॅथमने सावध फलंदाजी केली. उपाहारानंतरच्या दुसऱया सत्रात अँडरसनने यंगला 2 धावांवर झेलबाद केले. लॅथम आणि निकोल्स यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अधिक यश मिळाले नाही. लिचने लॅथमला रुटकरवी झेलबाद केले. त्याने 76 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 35 धावा जमविल्या. लिचने निकोल्सला पॉपकरवी झेलबाद केले. त्याने 38 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. मिचेल लिचच्या गोलंदाजीवर 13 धावा जमवित तंबूत परतला. स्टुअर्ट ब्रॉडने स्वतःच्याच गोलंदाजीवर ब्रेसवेलला टिपले. त्याने 6 धावा केल्या. दिवसअखेर ब्लंडेल 3 चौकारांसह 25 तर कर्णधार साऊदी 2 षटकार आणि 1 चौकारासह 23 धावांवर खेळत आहेत. चहापानावेळी न्यूझीलंडची स्थिती 6 बाद 96 अशी होती. चहापानानंतर किरकोळ पावसाच्या सरी कोसळल्याने पंचांनी हा खेळ निर्धारित वेळेपूर्वी थांबविला. 42 षटकात न्यूझीलंडने 7 बाद 138 धावा केल्या. इंग्लंडचा संघ 297 धावांनी आघाडीवर आहे. न्यूझीलंड संघावर पुन्हा पराभवाचे सावट वावरत आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात अँडरसनने 37 धावात 3 तर लिचने 45 धावात 3 तसेच ब्रॉडने 50 धावात 1 गडी बाद केला. या सामन्यातील खेळाचे दोन दिवस बाकी असून इंग्लंडचा संघ या मालिकेत न्यूझीलंडचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाला आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव 87.1 षटकात 8 बाद 435 डाव घोषित (बुक 186, रुट 153, स्टोक्स 27, ब्रॉड 14, रॉबिनसन 18, पॉप 10, हेन्री 4-100, ब्रेसवेल 2-54, साऊदी 1-93, वेग्नर 1-119), न्यूझीलंड प. डाव 42 षटकात 7 बाद 138 (लॅथम 35, निकोल्स 30, मिचेल 13, ब्लंडेल खेळत आहे 25, साऊदी खेळत आहे 23, अँडरसन 3-37, लिच 3-45, ब्रॉड 1-50).









