मार्क चॅपमन ‘मालिकावीर’, विल यंग ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ दुबई
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडने संयुक्त अरब अमिरातचा (युएई) 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने संयुक्त अरब अमिरातचा 32 धावांनी पराभव केला. या मालिकेत न्यूझीलंडने पहिला सामना जिंकल्यानंतर अमिरातने दुसरा सामना जिंकून बरोबरी साधली होती. त्यानंतर निर्णायक सामन्यात अमिरातला हार पत्करावी लागल्याने त्यांना मालिका गमवावी लागली. न्यूझीलंडच्या मार्क चॅपमनला ‘मालिकावीर’ तर विल यंगला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात अमिरात संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 166 धावा जमविल्या. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातने 20 षटकात 7 बाद 134 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये यंगने 46 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 56 तर मार्क चॅपमनने 32 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 51, सिफर्टने 11 चेंडूत 2 चौकारांसह 13, बोवेसने 1 चौकारांसह 9, सँटेनरने 11 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 20, फॉक्सक्रॉफ्टने 10 चेंडूत 10 धावा केल्या. यंग आणि चॅपमन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 10 षटकात 84 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 2 गडी गमविताना 38 धावा जमविल्या. न्यूझीलंडचे अर्धशतक 49 चेंडूत तर शतक 80 चेंडूत फलकावर लागले. यंगने 40 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. तसेच चॅपमनने 30 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले. न्यूझीलंडचे दीडशतक 110 चेंडूत नोंदविले गेले. अमिरात संघातर्फे सिद्दक्कीने 26 धावात 3 तर झेवूर खान आणि जेवादुल्लाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल करताना अमिरातचा डावात अफझलखानने 36 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 42, हमिदने 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 24, ए. शर्माने 22 चेंडूत 2 चौकारांसह 16, कर्णधार मोहम्मद वासिमने 2 चौकारांसह 8, व्ही. अरविंदने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 12, असिफ खानने 1 चौकारांसह 11 धावा केल्या. अमिरातच्या डावात 18 धावा अवांतराच्या रूपात मिळाल्या. त्यामध्ये 15 वाईड आणि 3 लेगबाईजचा समावेश आहे. अमिरातच्या डावामध्ये एकूण 3 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे लिस्टरने 3 तर जेमिसन, सँटेनर आणि ए. अशोक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अमिरात संघाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 40 धावा जमविताना 2 गडी गमविले. अमिरातचे अर्धशतक 49 चेंडूत तर शतक 90 चेंडूत फलकावर लागले. बसील हमीद व अफझल खान यांनी 6 व्या गड्यासाठी 68 धावांची भर घातली.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड – 20 षटकात 5 बाद 166 (यंग 56, चॅपमन 51, सँटेनर नाबाद 20, सिफर्ट 13, फॉक्सक्रॉफ्ट 10, अवांतर 7, सिद्दक्की 3-26, झेवूर खान आणि जेवादुल्ला प्रत्येकी 1 बळी), संयुक्त अरब अमिरात – 20 षटकात 7 बाद 134 (अफझल खान 42, हमीद नाबाद 24, अरविंद 12, ए. शर्मा 16, अरीफ खान 11, अवांतर 18, लिस्टर 3-33, जेमिसन, सँटेनर, ए. अशोक प्रत्येकी 1 बळी).









