विजयासह मालिकाही खिशात : पाकचा 115 धावांनी पराभव : सामनावीर फिन अॅलनची 20 चेंडूत 50 धावांची खेळी
वृत्तसंस्था/ ऑकलंड
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील चौथा सामना तौरंगा येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला, जिथे पाकिस्तानला लाजिरवाणा पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात सुरुवातीला पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांनी माती खाल्ली आणि नंतर फलंदाजांनी नांगी टाकली. या पराभवासह, पाकिस्तान संघाने मालिकाही गमावली आहे, कारण न्यूझीलंडने 3-1 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. उभय संघातील पाचवा व शेवटचा सामना दि. 26 रोजी होईल.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 220 धावा केल्या. यादरम्यान, टिम सेफर्ट आणि फिन ऍलन यांनी संघाला धमाकेदार सुरुवात दिली. टिम सेफर्टने 22 चेंडूत 44 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याच वेळी, फिन ऍलनने 20 चेंडूत 50 धावांची धमाकेदार खेळी साकारली. यानंतर, मायकेल ब्रेसवेलने नाबाद 46 धावा आणि डॅरिल मिशेलने 29 धावा करत संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकची सुरुवात खूपच खराब झाली. अर्धा संघ पॉवरप्लेमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानंतर न्यूझीलंडने सामन्यावर पूर्णपणे कब्जा केला आणि पाकिस्तानला काही वेळातच ऑलआउट केले. पाकिस्तान फक्त 16.2 षटके खेळू शकला आणि 105 धावा करून ऑलआऊट झाला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 20 षटकांत 6 बाद 220 (सेफर्ट 44, अॅलन 50, मिचेल 29, ब्रेसवेल नाबाद 46, हॅरिस रौफ 3 बळी, अब्रार अहमद 2 बळी)
पाकिस्तान 16.2 षटकांत सर्वबाद 105 (अब्दुल समद 44, इरफान खान 24, जेकब डफी 4 बळी, फोक्स 3 बळी).









