वृत्तसंस्था/ कराची
येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील मंगळवारी खेळाच्या दुसऱया दिवशी न्यूझीलंडने यजमान पाकला चोख प्रत्युत्तर दिले. पाकचा पहिला डाव 438 धावावर समाप्त झाल्यानंतर न्यूझीलंडने दिवसअखेर बिनबाद 165 धावा जमवल्या. लॅथम आणि कॉनवे यांनी नाबाद दमदार अर्धशतके झळकवली.
या कसोटीत पाकने आपल्या पहिल्या डावात 438 धावांचा डोंगर उभा केला. पाकने 5 बाद 317 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांच्या शेवटच्या 5 फलंदाजांनी 121 धावांची भर घातली. कर्णधार बाबर आझमने 280 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारासह 161 धावा, सर्फराज अहमदने 153 चेंडूत 9 चौकारासह 86 धावा तसेच आगा सलमानने 155 चेंडूत 17 चौकारासह 103 धावा झळकविल्या. पाकचे हे 3 फलंदाज वगळता इतर फलंदाजांना अधिक धावा जमवता आल्या नाहीत. सर्फराज अहमद आणि बाबर आझम यांनी पाचव्या गडय़ासाठी 296 धावांची भागीदारी केल्याने पाकला 400 धावांचा टप्पा ओलांडता आला. न्यूझीलंडतर्फे साऊदीने 3 तर अझाज पटेल, ब्रेसवेल आणि सोधी यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. वॅग्नरने एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लॅथम आणि कॉनवे या सलामीच्या जोडीने न्यूझीलंडच्या डावाला दमदार सुरुवात करून दिली. पाकच्या कर्णधाराने ही सलामीची जोडी फोडण्यासाठी गोलंदाजीमध्ये वारंवार बदल केले, पण त्याला यश मिळू शकले नाही. 47 षटकात न्यूझीलंडने बिनबाद 165 धावा जमवल्या. लॅथम 8 चौकारासह 78 तर कॉनवे 12 चौकारासह 82 धावावर खेळत आहे. न्यूझीलंडचा संघ अद्याप 273 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सर्व गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीत पुन्हा दोन्ही संघाकडून धावांचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.
संक्षिप्त धावफलक ः पाक प. डाव 130.5 षटकात सर्वबाद 438 (बाबर आझम 161, आगा सलमान 103, सर्फराज अहमद 86, इमाम उल हक 24, शकील 22, साऊदी 3-69, पटेल 2-112, ब्रेसवेल 2-72, सोधी 2-87, वॅग्नर 1-66), न्यूझीलंड प. डाव 47 षटकात बिनबाद 164 (लॅथम खेळत 78, कॉनवे खेळत आहे 82).









