आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप : न्यूझीलंडचा पाच गडी राखून विजय : तीन बळी घेत ट्रेंट बोल्ट पुन्हा फॉर्ममध्ये : रचिन, कॉनवेची शानदार खेळी
वृत्तसंस्था /बेंगळूर
येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने आपला दबदबा राखला. उपांत्य फेरीच्या प्रवेशासाठी विजय आवश्यक असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयासह किवीज संघाचे 9 सामन्यात 10 गुण झाले असून गुणतालिकेत ते चौथ्या स्थानावर आहेत. याशिवाय, लंकेवरील विजयासह त्यांच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा देखील कायम राहिल्या आहेत. प्रारंभी, किवीज गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर लंकेचा डाव 46.4 षटकांत 171 धावांवर आटोपला. यानंतर किवीज संघाने हे विजयी लक्ष्य 23.2 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. दरम्यान, 37 धावांत 3 बळी घेणाऱ्या न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यान, श्रीलंकेला हरवून त्यांनी सलग चार सामन्यातील पराभवाची मालिका खंडित केली. आता, किवी संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर त्याचा सामना मुंबईत भारताविरुद्ध होईल.
दरम्यान, 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून देवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी या दोघांनी 86 धावांची सलामी दिली. देवॉन कॉनवे 45 धावा करून बाद झाला. तो तंबूत पोहोचत नाही तोच रचिन रवींद्रही बाद झाला. रचिनने 42 धावा केल्या. यानंतर केन विल्यम्सन आणि डेरिल मिचेल यांनी मोर्चा सांभाळला. पण केन विल्यम्सनला 14 धावांवर अँजेलो मॅथ्यूजने तंबूत पाठवले. यानंतर मार्क चॅपमन 7 धावांवर धावचीत झाला. डेरिल मिचेलने संघाला विजयाच्या वेशीवर आणून ठेवले पण तो 43 धावा करून तंबूत परतला. यानंतर ग्लेन फिलिप्सने 3 चौकारासह नाबाद 17 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. किवीज संघाने 23.2 षटकांत विजयी आव्हान पूर्ण करत शानदार विजय मिळवला. लंकेकडून मॅथ्यूजने सर्वाधिक दोन गडी बाद केले.
लंकन फलंदाजांचे पुन्हा सपशेल लोटांगण
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अखेरच्या सामन्यात श्रीलंका संघ न्यूझीलंडविरुद्ध मोठे आव्हान उभे करायचे, या हेतूने मैदानात उतरला होता. मात्र, त्यांनी पॉवरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या 10 षटकातच 5 विकेट्स गमावल्या. या 5 विकेट्सपैकी 3 विकेट्स ट्रेंट बोल्टने, तर इतर दोन विकेट्स लॉकी फर्ग्युसन आणि टीम साऊदी यांनी घेतल्या. दुसऱ्याच षटकांत सलामीवीर पथुन निसंकाला 2 धावांवर साऊदीने बाद करत लंकेला पहिला धक्का दिला.
ट्रेंट बोल्टचे वर्ल्ड कपमध्ये बळींचे अर्धशतक
ट्रेंट बोल्टने या श्रीलंकेच्या डावातील पाचव्या षटकात 2 विकेट्स घेतल्या. यातील पहिली विकेट घेताच त्याच्या नावावर वनडे विश्वचषक इतिहासातील 50 विकेट्सची नोंद झाली. बोल्ट वर्ल्डकपमध्ये 50 विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा पहिलाच गोलंदाज ठरला. न्यूझीलंडकडून विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी टीम साऊदी आहे. त्याने 38 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, बोल्टने या सामन्यात तीन बळी घेत महत्वपूर्ण कामगिरी केली.
रचिन रवींद्रने वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावांचा सचिनचा विक्रम मोडला
वर्ल्डकपच्या इतिहासात पर्दापणामध्येच सर्वात मोठा पराक्रम करण्याचा मान न्यूझीलंडचा युवा खेळाडू रचिन रवींद्रने केला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 42 धावांची खेळी करताना वर्ल्डकपच्या इतिहासात पदार्पणामध्ये सर्वाधिक धावसंख्या नोंदवण्याचा पराक्रम केला. या खेळीसह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला आहे. सचिनने 1996 च्या वर्ल्डकपमध्ये 523 धावांचा पाऊस पाडला होता. रचिनने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 9 सामन्यात 565 धावा करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. रचिनने पहिल्याच विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करताना तीन शतके व दोन अर्धशतके देखील नोंदवली आहेत. न्यूझीलंड संघ उपांत्य फेरी व अंतिम फेरीत पोहोचल्यास त्याच्याकडे अधिक धावा करण्याची संधी असेल. विशेष म्हणजे, वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये आता तो प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने दिग्गज खेळाडूंना मागे टाकत प्रथम स्थान पटकावले आहे.
न्यूझीलंडचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित
न्यूझीलंडच्या संघाचे आता 9 सामन्यात 10 गुण झाले आहेत. या विजयासह त्यांचे सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित झाले असल्याने त्यांची उपांत्य लढत भारताविरुद्ध होईल. न्यूझीलंडचा रनरेट हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यापेक्षा खूप सरस आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या सामन्यात काही चमत्कार होतो का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. म्हणजे पाकला 287 धावांनी विजय मिळवावा लागेल किंवा 150 धावांचे टार्गेट मिळाले तर ते फक्त 3.4 षटकांतच त्यांना गाठावे लागेल, जे जवळपास अशक्य आहे. याशिवाय, अफगाणसाठी देखील त्यांचा शेवटचा सामना सोपा असणार नाही. न्यूझीलंडला रनरेटमध्ये मागे टाकण्यासाठी अफगाणला तब्बल 438 धावांनी विजय मिळवावा लागेल आणि तसे होणे अशक्यच आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये कुसल परेराचे सर्वात वेगवान अर्धशतक
श्रीलंकेकडून सलामीला फलंदाजीला उतरलेला फलंदाज कुसल परेराने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. परेराने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. परेराने हे अर्धशतक करताच, यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्याने दोन फलंदाजांचा विक्रम मोडला. त्याच्यापूर्वी हा विक्रम संयुक्तरीत्या कुसल मेंडिस आणि ट्रेविस हेड यांच्या नावावर होता. विश्वचषकाच्या इतिहासात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम न्यूझीलंडचा माजी कर्णधार फलंदाज ब्रेंडन मेकॉलमच्या नावावर आहे. त्याने 2015 च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध अवघ्या 18 चेंडूत वेगवान अर्धशतक केले होते.









