वृत्तसंस्था / वेलिंग्टन
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल ओरुरके त्यांच्या पाठीच्या खालच्या भारात स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तीन महिन्यांपर्यंत मैदानाबाहेर राहील. या महिन्याच्या सुरुवातीला झिम्बाब्वेमध्ये न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेदरम्यान ओरुरकेला दुखापत झाली होती. त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार नाही परंतु तो स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रोग्राममध्ये भाग घेईल.
ओरुरकेला न्यूझीलंडची ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका, ऑक्टोबरमध्ये इंग्लंडविरुद्धची टी-20 आणि एकदिवशीय मालिका आणि नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची व्हाईटबॉल मालिका मुकावी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या न्यूझीलंडच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तो परतू शकतो. 24 वर्षीय ओरुरकेने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणापासून 11 कसोटी सामन्यांमध्ये 39 बळी घेत न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ बनला आहे.









