पाचव्या टी 20 सामन्यातही पाकचा दारुण पराभव : मालिका 4-1 फरकाने न्यूझीलंडकडे : जेम्स नीशम सामनावीर
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
बुधवारी न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यातील पाचवा टी 20 सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला व मालिकाही 4-1 अशा फरकाने जिंकली. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाक संघाला 128 धावा करता आल्या. यानंतर न्यूझीलंडने अवघ्या 60 चेंडूतच हा सामना जिंकत पाकला जोरदार धक्का दिला. 22 धावांत 5 बळी घेणाऱ्या जेम्स नीशमला सामनावीर तर मालिकेत 249 धावांची बरसात करणाऱ्या टीम सिफर्टला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यान, उभय संघात आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 विकेट गमावत 128 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगाने सर्वाधिक 39 चेंडूत् 51 धावा केल्या. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. तर, शादाब खानने 20 चेंडूत 28 धावा फटकावल्या. तर, पाकिस्तानचे इतर फलंदाज अपयशी किवीज गोलंदाजासमोर सपशेल अपयशी ठरले. पाकच्या 8 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने शानदार गोलंदाजी करताना 22 धावांत 5 विकेट्स घेतल्या तर जेकब डफीला दोन बळी मिळाले
न्यूझीलंडचा 60 चेंडूत विजय
पाकिस्तानने न्यूझीलंडला दिलेले आव्हान सहजपणे पार केले. सलामीवीर टिम सिफर्ट आणि फिन एलन यांनी 6.2 ओव्हरमध्येच 93 धावांपर्यंत मजल मारली होती. फिल एलनने 12 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारासह 27 धावा केल्या. तर, टिम सिफर्टने पाकिस्तानच्या गोलंदाजींची धुलाई करताना अवघ्या 38 बॉलमध्ये 97 धावांची वादळी खेळी साकारली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार अन् 10 षटकार मारले. सिफर्टचे शतक केवळ तीन धावांनी हुकले. किवीज संघाने विजयासाठी लक्ष्य अवघ्या 10 षटकांतच पूर्ण करत सामन्यासह मालिकाही जिंकण्याची कामगिरी केली. पाकिस्तानकडून दोन विकेट सुफियान मुकीमने घेतल्या. दरम्यान, उभय संघात आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामना दि. 29 रोजी नेपियर येथे खेळवला जाईल.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 20 षटकांत 9 बाद 128 (मोहम्मद हॅरिस 11, सलमान आगा 39 चेंडूत 51, शादाब खान 28, जेम्स नीशम 5 बळी, जेकब डफी 2 बळी)
न्यूझीलंड 10 षटकांत 2 बाद 131 (टीम सिफर्ट नाबाद 97, फिन एलन 27, चॅपमन 3, मिचेल नाबाद 2, सुफियान 2 बळी).









