कर्णधार सुझी बेट्स सामनावीर, लंकेचा पराभव
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
तीन सामन्यांच्या महिलांच्या टी-20 मालिकेतील येथे रविवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने लंकेचा 9 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या मालिकेतील पहिला सामना लंकेने जिंकला होता. आता न्यूझीलंडने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली आहे. न्यूझीलंडची कर्णधार सुझी बेट्सला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकेने 20 षटकात 7 बाद 113 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 18.3 षटकात 3 बाद 117 धावा जमवित हा सामना 7 गड्यांनी जिंकला.
लंकेच्या डावामध्ये मेनूदी नानायकाराने 32 चेंडूत 4 चौकारांसह 35, कर्णधार चमारी अट्टापटूने 29 चेंडूत 4 चौकारांसह 23, निलाशिख सिल्वाने 22 चेंडूत 1 चौकारासह 20, समरविक्रमाने 11 तर दिलहारीने 1 चौकारासह 12 धावा केल्या. लंकेने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 33 धावा जमविताना 1 गडी गमाविला. लंकेचे अर्धशतक 59 चेंडूत तर शतक 106 चेंडूत नोंदविले गेले. लंकेच्या डावामध्ये 10 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे इलिंग, कार्सन यांनी प्रत्येकी 2 तर डिव्होन शेरी आणि हॅलिडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावामध्ये कर्णधार बेट्सने 46 चेंडूत 4 चौकारांसह 47 तर हॅलिडेने 40 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 46 धावा झळकाविल्या. मॅक्लोडने 1 चौकारासह 11 धावा केल्या. शार्पने 1 चौकारासह नाबाद 8 धावा जमविल्या. प्लिमेर 4 धावावर बाद झाली. बेट्स आणि हॅलिडे यांनी तिसऱ्या गड्यासाठी 43 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडच्या डावामध्ये 12 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे प्रियदर्शनी, सुगंधीका कुमारी आणि कुलसूर्या यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 39 धावा जमविताना 1 गडी गमाविला. न्यूझीलंडचे अर्धशतक 50 चेंडूत तर शतक 100 चेंडूत नोंदविले गेले. 10 षटकाअखेर न्यूझीलंडची स्थिती 2 बाद 57 अशी होती.
संक्षिप्त धावफलक : लंका 20 षटकात 7 बाद 113 (नानायकारा 35, सिल्वा 20, अट्टापटू 23, दिलहारी 12, समरविक्रमा 11, इलिंग व जेस केर प्रत्येकी 2 बळी, फ्लोरा आणि हॅलिडे प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड 18.3 षटकात 3 बाद 117 (सुझी बेट्स 47, मॅक्लोड 11, हॅलिडे नाबाद 46, प्रियदर्शनी, सुगंधीका कुमारी आणि कुलसूर्या प्रत्येकी 1 बळी).









