वृत्तसंस्था / हरारे
तिरंगी टी-20 मालिकेतील येथे मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात टिम सिफर्टच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने द. आफ्रिकेचा 25 चेंडू बाकी ठेवून सात गड्यांनी दणदणीत पराभव केला. अंतिम सामन्यापूर्वी या दोन संघातील ही रंगीत तालिम होती. या मालिकेत यजमान झिम्बाब्वेचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिकेने 20 षटकात 8 बाद 134 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 15.5 षटकात 3 बाद 135 धावा जमवित विजय नोंदविला.
द. आफ्रिकेच्या डावात हेन्ड्रीक्सने 37 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 41, जॉर्ज लिंडेने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 23, कर्णधार व्हॅन डेर ड्युसेनने 13 चेंडूत 3 चौकारांसह 14, ब्रेव्हीसने 2 चौकारांसह 13, हर्मनने 2 चौकारांसह 10 धावा आणि सिमेलेनीने 1 चौकारासह 11 धावा केल्या. द. आफ्रिकेच्या डावात 3 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे डफी, मिलेनी, सँटेनर यांनी प्रत्येकी 2 तर ओरुरकेने 1 गडी बाद केला. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 34 धावा जमविताना 1 गडी गमविला. द. आफ्रिकेचे अर्धशतक 55 चेंडूत तर शतक 93 चेंडूत नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावात सलामीच्या सिफर्टने 48 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 66 धावा जमविताना कॉनवेसमवेत पहिल्या गड्यासाठी 32 चेंडूत 51 धावांची भागिदारी केली. कॉनव्हेने 18 चेंडूत 3 चौकारांसह 19 धावा केल्या. रचिन रविंद्र केवळ 3 धावांवर बाद झाला. चॅपमनने 1 चौकारासह 10 धावा केल्या. सिफर्ट आणि मिचेल यांनी विजयाचे सोपस्कर पूर्ण केले. मिचेलने 15 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 20 धावा केल्या. न्यूझीलंडला 17 अवांतर धावा मिळाल्या. न्यूझीलंडच्या डावात 2 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेतर्फे मुत्तुसॅमीने 2 तर सिमेलेनीने 1 गडी बाद केला. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 55 धावा जमविताना 1 गडी बाद गमविला. न्यूझीलंडचे अर्धशतक 30 चेंडूत तर शतक 76 चेंडूत नोंदविले गेले. सिफर्टने 38 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह अर्धशतक झळकविले तसेच त्याने मिचेल समवेत चौथ्या गड्यासाठी 34 चेंडूत अर्धशतकीय भागिदारी केली.
संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका 20 षटकात 8 बाद 134 (हेन्ड्रीक्स 41, लिंडे नाबाद 23, व्हॅन डेर ड्युसेन 14, ब्रेव्हीस 13, हरमन 10, डफी, मिल्ने, सँटेनर प्रत्येकी 2 बळी, ओरुरके 1-26), न्यूझीलंड 15.5 षटकात 3 बाद 135 (सिफर्ट नाबाद 66, कॉनवे 19, मिचेल नाबाद 20, चॅपमन 10, अवांतर 17, मुत्तुसॅमी 2-24, सिमेलेनी 1-5)









