इंग्लंडवर 4 गडी राखून विजय : सामनावीर हॅरी ब्रूकची शतकी खेळी वाया
प्रतिनिधी/ माऊंट माऊगानाई
रविवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान न्यूझीलंडने इंग्लंडवर 4 गड्यांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने हॅरी ब्रूकच्या शतकी खेळीच्या जोरावर 223 धावा केल्या. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य न्यूझीलंडने 6 गड्यांच्या मोबदल्यातच पार करत विजयाला गवसणी घातली. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 29 रोजी हॅमिल्टन येथे होईल.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला सुरुवातीला मोठा धक्का बसला, केवळ 10 धावांवर 4 गडी बाद झाले. जेमी स्मिथ, बेन डकेट, जो रुट आणि जेकब बेथेल स्वस्तात बाद झाले. अनुभवी जोस बटलरही केवळ 4 धावांवर बाद झाल्याने इंग्लंडची 5 बाद 33 अशी बिकट स्थिती झाली होती.
ब्रूकची धमाकेदार शतकी खेळी
एका बाजूने विकेट्स पडत असताना, दुसऱ्या बाजूला कर्णधार हॅरी ब्रूक ठामपणे उभा राहिला आणि त्याने तुफानी फलंदाजी करत 101 चेंडूंवर 135 धावा ठोकल्या. त्याने 9 चौकार आणि 11 षटकारांची आतषबाजी केली. ब्रूकने शेवटच्या विकेटसाठी 57 धावा केल्या आणि 82 चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने चार षटकार झळकावले, पण मिशेल सॅन्टनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. ही ब्रूकची एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरी शतकी खेळी ठरली. तसेच, एका डावात 10 पेक्षा जास्त षटकार ठोकणारा तो इंग्लंडचा फक्त दुसरा कर्णधार ठरला. त्याला जेमी ओव्हर्टननेही (46) चांगली साथ दिली आणि दोघांनी मिळून सातव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. त्यांच्याशिवाय इतर कोणताही इंग्रजी फलंदाज द्विशतकी आकडा पार करू शकला नाही. यामुळे इंग्लंडचा डाव 35.2 षटकांत 223 धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून फोक्सने सर्वाधिक 4 गडी बाद केले. जेकब डफीने 3 तर मॅट हेन्रीने 2 गडी बाद केले.
न्यूझीलंडचा सहज विजय
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 224 धावांचा पाठलाग करताना यजमान किवीज संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विल यंग आणि रचिन रविंद्र लवकर बाद झाले. अनुभवी केन विल्यम्सनला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर मात्र डॅरिल मिचेलने 91 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 78 धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. त्याला ब्रेसवलने 51 धावांची खेळी करत मोलाची साथ दिली. यामुळे किवीज संघाने विजयासाठीचे टार्गेट 36.4 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. टॉम लॅथमने 24, सँटेनरने 27 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून ब्रेडॉन कार्सेने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 35.2 षटकांत सर्वबाद 223 (हॅरी ब्रूक 135, ओव्हर्टन 46, फोक्स 4 बळी, डफी 3 बळी)
न्यूझीलंड 36.4 षटकांत 6 बाद 224 (विल यंग 5, रचिन रविंद्र 17, मिचेल नाबाद 78, ब्रेसवेल 51, कार्से 3 बळी, ल्यूक वूड आणि अदिल रशीद प्रत्येकी 1 बळी).









