स्टीव्ह स्मिथचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 40 वे शतक, लाबुशानेचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ केर्न्स
यजमान ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत व्हाईटवॉश केला. या मालिकेतील तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 25 धावांनी पराभव केला. हा शेवटचा सामना दिवस-रात्रीचा खेळविण्यात आला होता.
या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 5 बाद 267 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव 49.5 षटकात 242 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या डावात स्टीव्ह स्मिथचे शतक वैशिष्टय़ ठरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे 40 वे शतक असून क्रिकेटच्या या क्रीडा प्रकारात सर्वाधिक शतके झळकविणाऱया फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ पाचव्या स्थानावर आहे. त्याला सामनावीर व मालिकावीर असे दोन्ही बहुमान मिळाले.
ऑस्ट्रेलियाच्या डावात स्टीव्ह स्मिथने 131 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारासह 105, लाबुशिंगेने 78 चेंडूत 2 चौकारासह 52, कॅरेने 43 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 42, ग्रीनने 12 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 25, मॅक्सवेलने 1 षटकारासह 14, इंग्लिशने 1 चौकारासह 10, कर्णधार फिंचने 5 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 4 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. स्मिथ आणि लाबुशिंगे यांनी तिसऱया गडय़ासाठी 118 धावांची भागीदारी केली. लाबुशाने बाद झाल्यानंतर कॅरेने स्मिथसमवेत चौथ्या गडय़ासमवेत 69 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडतर्फे बोल्टने 2, साऊदी, फर्ग्युसन, आणि सँटनर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणाऱया क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक शतके नोंदविणाऱया फलंदाजांच्या यादीत सध्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहली 71 शतकासह पहिल्या, इंग्लंडचा जो रुट 44 शतकांसह दुसऱया, ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर 43 शतकांसह तिसऱया, भारताचा कर्णधार रोहित शर्मा 41 शतकांसह चौथ्या तर स्टिव्ह स्मिथ 40 शतकांसह पाचव्या स्थानावर आहे. स्टिव्ह स्मिथने वनडे क्रिकेटमध्ये 12 तर कसोटी क्रिकेटमध्ये 28 शतके नोंदविली आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 100 शतके नोंदविली असून त्याचा हा विश्वविक्रम अद्याप अबाधित आहे. विराट कोहलीने 71 शतके, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 71 शतके, लंकेचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज संगकाराने 63 आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू कॅलिसने 62 शतके नोंदविली आहेत.
रविवारच्या शेवटच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडला विजयासाठी 268 धावांचे आव्हान मिळाले होते पण न्यूझीलंडचा डाव 49.5 षटकात 242 धावात आटोपला. न्यूझीलंड संघातर्फे फिलिप्सने 2 षटकार आणि 2 चौकारासह 47, नीशमने 5 चौकारासह 36, ऍलेनने 1 षटकार आणि 5 चौकारासह 35, कॉनवेने 5 चौकारासह 21, कर्णधार विल्यम्सनने 1 चौकारासह 27, सँटनरने 1 षटकार आणि 2 चौकारासह 30, मिचेलने 2 चौकारासह 16 तर लॅथमने 10 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने 60 धावात 3, ग्रीन आणि ऍबॉट यांनी प्रत्येकी 2, हॅजलवूड आणि झाम्पा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया 50 षटकात 5 बाद 267 (स्टीव्ह स्मिथ 105, लाबुशाने 52, कॅरे नाबाद 42, ग्रीन नाबाद 25, इंग्लिश 10, फिंच 5, मॅक्सवेल 14, बोल्ट 2-25, साऊदी, फर्ग्युसन आणि सँटनर प्रत्येकी एक बळी), न्यूझीलंड 49.5 षटकात सर्वबाद 242 (फिलिप्स 47, नीशम 36, ऍलेन 35, सँटनर 30, कॉनवे 21, विल्यम्सन 27, मिचेल 16, लॅथम 10, स्टार्क 3-60, ग्रीन 2-25, अबॉट 2-31, हॅजलवूड 1-51, झाम्पा 1-53).









