पहिल्या टी 20 सामन्यात यजमानांचा 9 गड्यांनी विजय : सामनावीर काईल जेमिसनचे तीन तर जेकब डफीचे 4 बळी
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
चॅम्पियन्स ट्रॉफीतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानला पहिल्याच टी 20 सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकवर 59 चेंडू व 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकचा संघ 91 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर किवी संघाने विजयी लक्ष्य 10.1 षटकांत एक गड्याच्या मोबदल्यात पार केले. अवघ्या 8 धावांत 3 बळी घेणाऱ्या न्यूझीलंडच्या काईल जेमिसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील अपयशानंतर पाकिस्तानच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. बाबर-रिझवानला वगळत पाकिस्तानचा टी 20 साठी नवा संघ तयार करण्यात आला असून संघाचे कर्णधारपद सलमान अली आगाकडे देण्यात आले आहे. पण त्याच्या नेतृत्त्वात पहिल्याच सामन्यात पाकचा धुव्वा उडाला आहे. या विजयासह किवी संघाने पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 18 रोजी ड्युनेडिन येथे होईल.
पाकचा 91 धावांत खुर्दा
न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. पाकिस्तान संघ पहिल्याच षटकापासून बॅकफूटवर असल्याचे दिसून आले. त्यांचा सलामीवीर मोहम्मद हॅरिस पहिल्याच षटकात खाते न उघडताच बाद झाला. यानंतर दुसरा सलामीवीर हसन नवाजला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर इरफान खानच्या रूपाने पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. त्यालाही केवळ 1 धाव करता आली. पाकिस्तानची सुरुवात इतकी खराब झाली होती की, पहिल्या 3 षटकांत त्यांना केवळ 3 धावा करता आल्या. शादाब खानच्या रूपात पाकने चौथी विकेट गमावली. यानंतर सलमान आगा आणि खुशदिल शाह यांच्यात छोटीशी भागीदारी पाहायला मिळाली. पण ही जोडीही फार काही करू शकली नाही आणि कर्णधार सलमान आगा 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसरीकडे, खुशदिल शाहने 32 धावा केल्या, जो या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्याशिवाय जहांदाद खानने 17 धावा केल्या. इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केल्याने तरीही पाकचा संघ 18.4 षटकांत 91 धावा करून सर्वबाद झाला.
किवी संघाचा 61 चेंडूत सहज विजय
न्यूझीलंडसमोर हा सामना जिंकण्यासाठी 92 धावांचे लक्ष्य होते. किवी फलंदाजांना हे साध्य करण्यासाठी अजिबात वेळ लागला नाही. त्यांनी फक्त 10.1 षटकांत म्हणजेच 61 चेंडूत लक्ष्याचा पाठलाग केला. न्यूझीलंडकडून टीम सेफर्टने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 29 चेंडूत 151.72 च्या स्ट्राईक रेटने 7 चौकार आणि एका षटकारासह 44 धावा केल्या. तर, फिन अॅलन 17 चेंडूंत 29 धावा करुन नाबाद राहिला. टीम रॉबिन्सननेही 15 चेंडूत 18 धावांची नाबाद खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 18.4 षटकांत सर्वबाद 91 (सलमान आगा 18, खुशदिल शाह 32, जेहनाद खान 17, जेकब डफी 4 बळी, काईल जेमिसन 3 बळी)
न्यूझीलंड 10.1 षटकांत 1 बाद 92 (टीफ सेफर्ट 44, फिन अॅलन नाबाद 29, टीम रॉबिन्सन नाबाद 18, अब्रार अहमद 1 बळी).









