वृत्तसंस्था / वेलिंग्टन
पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी पाच सामन्यांची वनडे मालिकेसाठी क्रिकेट न्यूझीलंडने मंगळवारी संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व टॉम लॅथमकडे सोपविण्यात आले आहे. ही मालिका पाकिस्तानमध्ये 26 एप्रिलपासून खेळविली जाणार आहे.

या वनडे मालिकासाठी घोषित करण्यात आलेल्या न्यूझीलंड संघामध्ये कर्णधार केन विलियम्सन, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ग्लेन फिलिप्स, मिचेल ब्रेसवेल, मिचेल सँटेनर आणि फिन अॅलेन यांचा सहभाग करण्यात आलेला नाही. या अव्वल खेळाडूंच्या गैरहजेरीत न्यूझीलंड संघाला या आगामी वनडे मालिकेत पाक संघाशी लढत द्यावी लागणार आहे. चालू वर्षाच्या प्रारंभी पाकिस्तानमध्ये न्यूझीलंडने वनडे मालिका मोठ्या प्रमाणात यशस्वी केली होती. न्यूझीलंड संघामध्ये आता डॅरिल मिचेल, मॅट हेन्री, जेम्स निशम, हेन्री निकोल्स आणि इश सोधी यांचा समावेश करण्यात आला आहे. उभय संघातील ही वनडे मालिका 26 एप्रिलला रावळपिंडीमध्ये सुरू होणार असून 7 मे रोजी कराचीत ती संपणार आहे. दरम्यान 14 ते 24 एप्रिल दरम्यान उभय संघात 5 सामन्यांची टी-20 मालिकाही आयोजित केली आहे.
न्यूझीलंड संघ- टॉम लॅथम (कर्णधार), ब्लंडेल, बोवेस, मॅट हेन्री, बेन लिस्टर, कोले, मॅकोन्ची, अॅडॅम मिलेनी, डॅरील मिचेल, जिमी निशम, हेन्री निकोल्स, रचिन रविंद्र, हेन्री सिप्ले, इश सोधी, टिकनेर आणि विल यंग.









