वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचे कमबॅक : टॉम लॅथमकडे नेतृत्वाची धुरा
वृत्तसंस्था/ ऑकलंड
आगामी आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय न्यूझीलंड संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली. वनडे मालिकेसाठी टॉम लॅथमला कर्णधार म्हणून निवडले आहे, तर दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याच्यासोबतच काईल जेमिसन याचेही दीर्घ काळानंतर संघात पुनरागमन झाले आहे. उभय संघात 30 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर यादरम्यान 4 टी-20 व 4 वनडे सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने वनडे विश्वचषक स्पर्धेपूर्वी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मागील 1 वर्षांपासून न्यूझीलंड संघातून बाहेर असलेला ट्रेंट बोल्ट फक्त फ्रँचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत होता. मात्र, विश्वचषकापूर्वी संघाने आपल्या दिग्गज गोलंदाजाला ताफ्यात सामील केले आहे. तसेच, युवा गोलंदाज काईल जेमिसन हादेखील पाठीच्या दुखापतीनंतर संघात परतला आहे. केन विल्यम्सन एप्रिलमध्ये झालेल्या दुखापतीनंतर प्रशिक्षण आणि रिहॅब सुरू ठेवण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर संघासोबत जोडला जाणार आहे. दरम्यान, ईश सोधी टी-20 मालिकेनंतर मायदेशी परतणार असून तो वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे किवीज बोर्डाने स्पष्ट केले. तसेच मार्क चॅपमन व जिमी नीशम यांनी वैयक्तिक कारणास्तव इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतली आहे.
उभय संघात सुरुवातीला चार सामन्यांची टी-20 मालिका होणार असून यानंतर 4 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल. दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यासाठी युवा व अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देत समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेनंतर विश्वचषकासाठी संघ जाहीर करणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा वनडे संघ –
टॉम लॅथम (कर्णधार), फिन ऍलेन, ट्रेंट बोल्ट, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, काईल जेमिसन, अॅडम मिल्ने, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टीम साऊदी आणि विल यंग.









