वृत्तसंस्था/ इंदूर
महिला विश्वचषक सामन्यात आज न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा गोलंदाजीमध्ये सुधारणा करणे हे न्यूझीलंडच्या अजेंड्यावर सर्वोच्च असेल, तर दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य फलंदाजीच्या फॉर्मवर काम करणे हे असेल. ते आपापल्या सुऊवातीच्या सामन्यांमध्ये झालेल्या दाऊण पराभवाची निराशा विसरून खेळण्याचा प्रयत्न करतील.
याआधीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 89 धावांनी पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर इंग्लंडने 10 गडी राखून विजय मिळवला. दोन्ही समान्यांत पराभूत संघांची फलंदाजीची कामगिरी निराशाजनक होती, परंतु 22 व्या षटकात ऑस्ट्रेलियाची 5 बाद 128 अशी घसरगुंडी उडविल्यानंतरही न्यूझीलंडने हात टेकले आणि त्यांना 326 पर्यंत पोहोचविले. ऑस्ट्रेलियाची सर्वांत मौल्यवान अष्टपैलू खेळाडू अॅश्ले गार्डनरने शानदार प्रतिहल्ला करणाऱ्या शतकासह डाव उलटविला. परंतु न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हिनच्या 112 धावांना तिच्या सहकाऱ्यांनी साथ दिली नाही. त्यांचे शेवटचे पाच फलंदाज फक्त 19 धावांत बाद झाले.
दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत परिस्थिती अधिकच बिकट झाली. कारण त्यांचा डाव 69 धावांवर संपला आणि केवळ एका खेळाडूने दुहेरी आकडा गाठला. क्षिण आफ्रिकेला स्पर्धात्मक बनण्यासाठी लॉरा वोल्वार्ड्ट, टॅझमिन ब्रिट्स, सून लुस आणि मॅरिझान कॅप यांना फलंदाजीतून अधिक योगदान द्यावे लागेल. खरे तर विश्वचषकापूर्वीच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता आणि ते केवळ 115 धावा करू शकले होते. हे त्यांच्या फलंदाजीत सातत्याने आलेल्या अपयशाचे दर्शन घडवते.
कागदावर न्यूझीलंडकडे दोन्ही विभागांमध्ये चांगली गुणवत्ता असून विशेषत: फिरकी गोलंदाजीचा विचार करता अमेलिया केरची 10 षटके निर्णायक ठरतील. न्यूझीलंडला परिस्थितीची चांगली समज आहे. हे लक्षात घेता त्यांचे पारडे भारी ठरते. कारण न्यूझीलंड या ठिकाणी सलग दुसरा सामना खेळत आहे. तर दक्षिण आफ्रिका संघ गुवाहाटीहून येथे दाखल झालेला असून चेंडू सहजपणे बॅटवर येणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाज चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा त्यांच्या संघ व्यवस्थापनाला राहील.
सामन्याची वेळ : दु. 3 वा.









