पहिल्या वनडेत 8 गडी राखून विजय : सामनावीर कॉनवे-मिचेलची नाबाद शतके
वृत्तसंस्था/ कार्डिफ (इंग्लंड)
इंग्लंडमध्ये सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (8 सप्टेंबर) खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात यजमान इंग्लंडने शानदार फलंदाजी करत 50 षटकांत 6 बाद 291 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडसाठी सलामीवीर डेवॉन कॉनवे व डेरिल मिचेल यांनी नाबाद शतके करत संघाला 8 गडी राखून विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना आज साऊथम्पटन येथे होईल.
प्रारंभी, न्यूझीलंडने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड मलान व हॅरी ब्रुक 80 धावांची शानदार सलामी दिल्यानंतर ते दोघेही याच धावसंख्येवर तंबूत परतले. मलानने 9 चौकारासह 54 तर ब्रुकने 25 धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर अनुभवी जो रुट 6 धावांवर स्वस्तात बाद झाला. दरम्यान, संघ अडचणीत सापडलेला असताना बेन स्टोक्सने जबाबदारीने खेळ करत अप्रतिम अर्धशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 69 चेंडूंमध्ये 52 धावा करताना 3 चौकार व एक षटकार ठोकला. त्याला रचिन रवींद्रने बाद केले. या सामन्यातून अष्टपैलू बेन स्टोक्सने पुनरागमन केले. वर्षभरापेक्षा जास्तच्या कालावधीनंतर वनडे सामना खेळताना त्याने शानदार अर्धशतक झळकावले. स्टोक्सने अतिरिक्त क्रिकेटचे कारण देत मागील वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर आता विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा वनडे कर्णधार जोस बटलरने त्याला विनंती केल्यानंतर त्याने आपली निवृत्ती मागे घेतली. त्यानंतर आता तो न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरला.
बटलर, लिव्हिंगस्टोनची अर्धशतके
कर्णधार जोस बटलरने शानदार खेळ दाखवताना आक्रमक 68 चेंडूत 72 धावा फटकावल्या. तर, लियाम लिव्हिंगस्टोनने 40 चेंडूंवर 52 धावा कुटल्या. विलीने नाबाद 21 धावांची खेळी साकारली. यामुळे इंग्लंडने निर्धारित 50 षटकात 291 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून युवा रचिन रवींद्रने 3 तर टीम साऊदीने 2 बळी टिपले.
कॉनवे, मिचेलची नाबाद शतके
विजयासाठीच्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची आश्वासक सुरुवात झाली. डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग या दोघांनी 61 धावांची सलामी भागीदारी केली. विल यंग 29 धावा करुन परतला. यानंतर हेन्री निकोल्ससोबत कॉनवेने दुसऱ्या विकेटसाठी 54 रन्सची पार्टनरशीप केली. निकोलस 26 रन्स करुन मैदानाबाहेर गेला. यानंतर फलंदाजीला डॅरेल मिचेल मैदानात आला. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. कॉनवे-मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 157 बॉलमध्ये 180 रन्सची नाबाद विजयी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी चौफेर फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढली. कॉनवेने 121 चेंडूत 13 चौकार व 1 षटकारासह नाबाद 111 तर मिचेलने 91 चेंडूत 7 चौकार व 7 षटकारासह नाबाद 118 धावा केल्या. यामुळे किवीज संघाने विजयी लक्ष्य 45.4 षटकांत 2 गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. इंग्लंडकडून आदिल रशीद व डेविड विलीने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 50 षटकांत 6 बाद 291 (डेव्हिड मलान 54, बेन स्टोक्स 52, जोस बटलर 72, लिव्हिंगस्टोन 52, विली नाबाद 21, साऊदी 71 धावांत 2 बळी, रचिन 48 धावांत 3 बळी).
न्यूझीलंड 45,4 षटकांत 2 बाद 297 (कॉनवे नाबाद 111, मिचेल नाबाद 118, यंग 29, निकोल्स 26, आदिल रशीद, विली प्रत्येकी एक बळी) .









