वृत्तसंस्था /चेन्नई
कर्णधार आणि प्रमुख फलंदाज केन विल्यमसनच्या पुनरागमनामुळे बळकट झालेले न्यूझीलंड आज शुक्रवारी येथे होणार असलेल्या विश्वचषक लढतीत फिरकी माऱ्यावर भार असलेल्या बांगलादेशचा सामना करणार आहे. यावेळी बांगलादेशला पराभूत करून विश्वचषकाच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान ते बळकट करू पाहतील. किवीजचे आता भारत आणि पाकिस्तानसारखेच चार गुण आहेत, परंतु चांगल्या धावसरासरीने त्यांना पुढे ठेवले आहे आणि आज विजय मिळविल्यास त्यांचे अव्वल स्थान तात्पुरते तरी आणखी मजबूत होईल. त्यासंदर्भात दुखापतीनंतरच्या शस्त्रक्रियेतून सावरलेल्या विल्यमसनचे पुनरागमन त्यांना दोन बाबतीत फायदेशीर ठरेल. विल्यमसन हा एक चतुर कर्णधार आहे आणि तो फिरकीविऊद्धच्या उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. विल्यमसनने इंग्लंड आणि नेदरलँड्सविऊद्धचे किवींचे सामने गमावले होते. टॉम लॅथमने त्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून जबाबदारी पेलली होती.
पण न्यूझ्^ााrलंडला वरिष्ठ वेगवान गोलंदाज टीम साउदीची सेवा याही सामन्यात मिळणार नाही. विल्यमसनला सामावून घेण्यासाठी कोणाला वगळायचे याचा विचार किवीज व्यवस्थापनाला करावा लागणार आहे. कारण विल्यसमनच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केलेल्या रचिन रवींद्रने दोन सामन्यांमध्ये एक शतक व एक अर्धशतक झळकावलेले आहे. त्याशिवाय विल यंग, डेव्हॉन कॉनवे आणि डॅरिल मिशेल हेही फलंदाज फॉर्मात आहेत. चेन्नईतील खेळपट्टी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याप्रमाणे फिरकीस पोषक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे कर्णधार शकीब उल हसन, महेदी हसन आणि मेहदी हसन मिराझ हे फिरकी त्रिकूट प्रभावी ठरू शकते. त्यांनी दोन सामन्यांत 11 बळी घेतले आहेत. दुसरीकडे, डावखुरा फिरकीपटू मिशेल सँटनरच्या उपस्थितीमुळे न्यूझीलंडकडेही एक समर्थ पर्याय उपलब्ध आहे. बांगलादेशला शकिब, मुशफिकुर रहीम, लिटन दास आणि नजमुल शांतो यासारख्या फलंदाजांकडून चांगल्या योगदानाची गरज भासेल. त्यांना सँटनरचा मुकाबला करावा लागणार आहे. तसेच न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांचा समावेश असलेला वेगवान मारा जास्त धारदार आहे.
संघ
बांगलादेश : शकीब उल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराझ, नसुम अहमद, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रेहमान, हसन महमूद, शोरिफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब.
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा. प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, डिस्ने हॉटस्टार अॅप.









