वृत्तसंस्था/ लाहोर
तिरंगी वनडे क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकवर 78 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकला निर्णायक विजयासाठी 331 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर पाकचा डाव 47.5 षटकात 252 धावांत आटोपला. तत्पूर्वी न्यूझीलंडने 50 षटकात 6 बाद 330 धावा झळकविल्या. न्यूझीलंडतर्फे ‘सामनावीर’ फिलीप्सने नाबाद शतक तर विलियमसन आणि मिचेल यांनी अर्धशतके झळकविली.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीने सलामीच्या यंगला 4 धावांवर झेलबाद केले. अब्रार अहम्मदने स्वत:च्याच गोलंदाजीवर रचिन रविंद्रनला टिपले. त्याने 5 चौकारांसह 25 धावा केल्या. विलियमसन आणि मिचेल यांनी तिसऱ्या गड्यासाठी 95 धावांची भागिदारी केली. विलियमसनने 89 चेंडूत 7 चौकारांसह 58 धावा केल्या. टॉम लेथम रौफच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. मिचेलने 84 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 81 धावा झळकविल्या. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 5 बाद 200 अशी होती. फिलीप्स आणि ब्रेसवेल या जोडीने सहाव्या गड्यासाठी 54 धावांची भागिदारी केली. ब्रेसवेलने 3 षटकार आणि 1 चौकारांसह 23 चेंडूत 31 धावा जमविल्या. फिलीप्सने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 74 चेंडूत 7 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 106 धावा जमविताना सँटेनरसमवेत सातव्या गड्यासाठी अभेद्य 76 धावांची भागिदारी केल्याने न्यूझीलंडला 330 धावांपर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडच्या डावामध्ये 14 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे शाहीन आफ्रिदीने 3 तर अब्रार अहम्मदने 2 व रौफने 1 गडी बाद केला.
पाकचा डाव 47.5 षटकात 252 धावांत आटोपला. फक्र झमानने 69 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह 84, सलमान आगाने 2 चौकार आणि 1 षटकारासह 40, तयाब ताहीरने 4 चौकारांसह 30, अब्रार अहम्मदने 15 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 23 धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री आणि सॅन्टेनर यांनी प्रत्येकी 3 तर ब्रेसवेलने 2 आणि फिलीप्सने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड 50 षटकात 6 बाद 330 (फिलीप्स नाबाद 106, मिचेल 81, विलियमसन 58, ब्रेसवेल 31, रचिन रविंद्र 25, अवांतर 17, शाहीन आफ्रिदी 3-88, अब्रार अहम्मद 2-41, रौफ 1-23), पाक 47.5 षटकात सर्वबाद 252 (फक्र झमान 84, सलमान आगा 40, तयाब ताहीर 30, अब्रार अहम्मद नाबाद 23, हेन्री व सँटेनर प्रत्येकी 3 बळी, ब्रेसवेल 2 तर फिलीप्स 1 बळी)









