केन विलियमसनचे दीड शतक, इंग्लंड पराभवाच्या छायेत
वृत्तसंस्था / अॅमिल्टन
येथे सुरू असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी यजमान न्यूझीलंडने इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 658 धावांचे कठीण आव्हान दिले आहे. न्यूझीलंडच्या केन विलियमसनने दुसऱ्या डावात दमदार दीड शतक (156) झळकविले. इंग्लंडने दिवसअखेर दुसऱ्या डावात 2 बाद 18 धावा जमविल्या.
या कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव 347 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 143 धावांत संपुष्टात आल्याने न्यूझीलंडने 203 धावांची भक्कम आघाडी मिळविली. न्यूझीलंडने 3 बाद 136 या धावसंख्येवरुन सोमवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 101.4 षटकात 453 धावांवर आटोपला. केन विलियमसनने दमदार फलंदाजी करताना 204 चेंडूत 1 षटकार आणि 20 चौकारांसह 156 धावा झळकविल्या. यंगने 85 चेंडूत 9 चौकारांसह 7 धावा जमविताना विलियमसनसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 89 धावांची भागिदारी केली. कर्णधार लेथम 19 धावांवर बाद झाला तर ओरुरकेला खाते उघडता आले नाही. रचिन रविंद्र, डॅरियल मिचेल आणि ब्लंडेल यांच्याकडून विलियमसनला चांगली साथ मिळाली. रचिन रविंद्रने विलियमसनसमवेत 107 धावांची भागिदारी चौथ्या गड्यासाठी केली. रचिन रविंद्रने 90 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 44 धावा जमविल्या. मिचेलने 84 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 60 धावा जमविल्या. ब्लंडेलने 55 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 44 धावा केल्या. सॅन्टेनरने 38 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह 49 धावा केल्या.
विलियमसनचा विक्रम
केन विलियमसनचे कसोटी क्रिकेटमधील हे 33 वे शतक असून सिडॉन पार्कवरील त्याचे हे सातवे आणि माय देशात कसोटीतील त्याचे हे पाचवे शतक आहे. जवळपास सहा तास खेळपट्टीवर राहून विलियमसनने न्यूझीलंडला भक्कम स्थितीत नेले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदांच्या यादीत विलियमसन आता 17 व्या स्थानावर आहे. त्याने द. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथला मागे टाकले आहे. तर आता तो द. आफ्रिकेच्या हाशीम आमलाला मागे टाकण्यासाठी त्याला केवळ सहा धावांची जरुरी आहे. विलियमसनने 137 चेंडूत शतक तर 196 चेंडूत दीड शतक झळकविले.
या कसोटीतील सोमवारच्या खेळाच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे उपाहारापर्यंतचा खेळ होऊ शकला नाही. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात इंग्लंडतर्फे बेथेलने 72 धावांत 3 तर स्टोक्स आणि शोएब बशिर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. पॉटस्, अॅटकिनसन आणि रुट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये न्यूझीलंडचा दुसरा डाव आटोपला. त्यानंतर शेवटच्या सहा षटकामध्ये इंग्लंडच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. सलामीचा क्रॉले केवळ 5 धावांवर तर डकेट 4 धावावर बाद झाले. बेथेल 9 धावांवर खेळत आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात 2 बाद 18 धावा जमविल्या. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून न्यूझीलंडचा संघ मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. न्यूझीलंडतर्फे साऊदी आणि हेन्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या कसोटी मालिकेत इंग्लंडने पहिले दोन सलग दोन सामने जिंकून विजयी आघाडी घेतल्याने न्यूझीलंडचा संघ आता शेवटची कसोटी जिंकून इंग्लंडला एकतर्फी मालिका जिंकण्यापासून रोखण्याची शक्यता आहे.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प. डाव 97.1 षटकात सर्वबाद 347, इंग्लंड प. डाव 35.4 षटकात सर्वबाद 143, न्यूझीलंड दु. डाव 101.4 षटकात सर्वबाद 453 (विलियमसन 156, यंग 60, रचिन रविंद्र 44, मिचेल 60, ब्लंडेल नाबाद 44, सॅन्टेनर 49, अवांतर 16, बेथेल 3-72, स्टोक्स 2-52, शोएब बशिर 2-170, पॉटस्, अॅटकिनसन, रुट प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड दु. डाव 6 षटकात 2 बाद 18 (क्रॉले 5, डकेट 4, बेथेल खेळत आहे 9, हेन्री 1-14, साऊदी 1-4)









