वृत्तसंस्था / ऑकलंड
2026 साली होणाऱ्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी न्यूझीलंडच्या फुटबॉल संघाने आपली पात्रता सिद्ध केली आहे. येथे झालेल्या ओसेनिया कॉन्फडरेशन पात्र फेरीच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडने न्यू कॅलेडोनियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला.
फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासामध्ये न्यूझीलंडने आतापर्यंत तीनवेळा आपला सहभाग दर्शविला आहे. 1982 साली स्पेनमध्ये झालेल्या स्पर्धेत तर 2010 साली द. आफ्रिकेत झालेल्या फिफाच्या स्पर्धेमध्ये न्यूझीलंडचा समावेश होता. ओसेनिया कॉन्फडरेशन पात्र फेरीच्या या फुटबॉल स्पर्धेत अनेक संघांचा समावेश होता. गेल्या आठवड्यात यजमान कॅनडा, अमेरिका, मेक्सीको आणि जपान यांनी 2026 च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आपले तिकीट निश्चित केले आहे. न्यू कॅलेडोनिया संघाला अद्याप आणखी एक पात्रतेची संधी उपलब्ध आहे. आशिया, आफ्रिका, उत्तर आणि मध्य अमेरिकन त्याचप्रमाणे द. अमेरिकन कॉन्फडरेशनच्या आंतर खंडीय प्ले ऑफ स्पर्धेत 6 संघांचा समावेश आहे. या संघांमध्ये स्थान मिळविण्याची न्यू कॅनेडोनियाला संधी आहे.
न्यूझीलंड आणि न्यू कॅलेडोनिया यांच्यातील सामन्यात मध्यंतरापर्यंत गोल फलक कोराच होता. या सामन्यातील 53 मिनिटांपर्यंत उभय संघाकडून खाते उघडले गेले नाही. न्यूझीलंडचा कर्णधार ख्रिस वूडला 53 व्या मिनिटाला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. सामन्यातील 63 व्या मिनिटाला मिचेल बॉक्सऑलने न्यूझीलंडचे खाते उघडले. 67 व्या मिनिटाला न्यूझीलंडचा दुसरा गोल निकेनीने केला. 80 व्या मिनिटाला न्यूझीलंडचा तिसरा आणि शेवटचा गोल इलेजीने केला.









