चार दिग्गज कोचिंग स्टाफमध्ये : किवीज बोर्डाच्या विविध योजना
वृत्तसंस्था/ ऑकलंड
आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मोठे पाऊल उचलले आहे. बोर्डाने घोषणा करत अनेक दिग्गजांना सपोर्ट स्टाफमध्ये सामील केले आहे. हे माजी दिग्गज खेळाडू भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेसह परदेशातील अनेक दौऱ्यावर संघासोबत असतील. बोर्डाच्या या निर्णयामुळे संघाची ताकद निश्चितच वाढणार आहे.
इंग्लंडचा माजी फलंदाज इयान बेल, इंग्लंडचाच माजी यष्टीरक्षक जेम्स फोस्टर, माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आणि पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक यांना सपोर्ट स्टाफमध्ये सामील केले असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. हे दिग्गज खेळाडू पुढील काही महिन्यांमध्ये परदेशातील द्रौयांवर संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग असतील. 2020 पासून प्रशिक्षणाच्या दुनियेत पाऊल ठेवणारा अॅशेस विजेता इयान बेल 30 ऑगस्ट रोजी आपल्याच देशाविरुद्ध सुरू होत असलेल्या टी-20 मालिकेत सहायक प्रशिक्षक असेल. तो विश्वचषकाची तयारी करण्यासाठी इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यांसाठी ल्यूक राँचीच्या जागी फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावेल. गॅरी स्टीड यांच्या नेतृत्वात ल्यूक राँची आणि शेन जुर्गेंसन विश्वचषकासाठी उपस्थित असतील.
इंग्लंडचा माजी यष्टीरक्षक फलंदाज जेम्स फोस्टर इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसोबतच विश्वचषकासाठीही सहायक प्रशिक्षकाच्या रूपात काम करेल. चेन्नई सुपर किंग्स संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यादरम्यान न्यूझीलंडच्या ताफ्यात प्रशिक्षक म्हणून दुसऱ्यांदा काम करतील. तसेच, पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक विश्वचषकानंतर बांगलादेशमध्ये कसोटी मालिकेदरम्यान संघाची मदत करतील.
सध्या मोठ्या प्रमाणात खेळले जात असलेल्या क्रिकेटकडे पाहता आमच्या खेळाडूंचे आणि सपोर्ट स्टाफचे भले महत्त्वाचे आहे. माजी दिग्गज खेळाडू सपोर्ट स्टाफमध्ये आल्यामुळे न्यूझीलंड क्रिकेटची ताकद नक्कीच वाढेल, यात कोणतीही शंका नाही, असे न्यूझीलंड संघाचे मॅनेजर सिमोन इन्सली म्हणाले.









