वृत्तसंस्था/ कराची
यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 0-0 अशी अनिर्णित राहिली. या मालिकेतील येथे शुक्रवारी दुसरा सामनाही अनिर्णित अवस्थेत संपला. पाकच्या सर्फराज अहमदला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असे दोन्ही पुरस्कार मिळाले.
या दुसऱया कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 449 धावा जमवल्यानंतर पाकचा पहिला डाव 408 धावात आटोपल्याने न्यूझीलंडने 41 धावांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर न्यूझीलंडने आपला दुसरा डाव 5 बाद 277 धावावर घोषित करून पाकिस्तानला खेळाच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी 319 धावांचे आव्हान दिले होते. दरम्यान पाकने गुरुवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर 2 बाद 0 धावा जमवल्या होत्या. अब्दुल शफीक आणि हमजा हे खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतले होते.

पाकने 2 बाद 0 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली पण सर्फराज अहमदच्या चिवट शतकामुळे सामन्याला अधिकच रंगत आली. खेळाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये दोन्ही संघांना विजयाची समान संधी उपलब्ध झाली होती. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शेवटच्या तासभरामध्ये भेदक गोलंदाजी करत पाकवर दडपण आणले होते. अखेर अंधूक प्रकाशामुळे पंचानी हा सामना निर्धारित षटकांपैकी तीन षटके बाकी असताना थांबवला. त्यामुळे हा सामना आणि मालिकाही बरोबरीत राहिली.
पाकने दुसऱया डावात 90 षटकात 9 बाद 304 धावा जमवल्या. सर्फराज अहमदने 176 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारासह 118, शान मसूदने 66 चेंडूत 5 चौकारासह 35, कर्णधार बाबर आझमने 41 चेंडूत 5 चौकारासह 27, इमाम उल हकने 2 चौकारासह 12, शकीलने 4 चौकारासह 32 तसेच सलमानने 4 चौकारासह 30 धावा जमवल्या. सर्फराज अहमद नवव्या गडय़ाच्या रुपात बाद झाल्यानंतर न्यूझीलंडला पुन्हा विजयाची संधी निर्माण झाली होती पण नसीम शहा आणि अब्रार अहमद यांनी 3.3 षटके खेळून काढत हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. नसीम शहा 1 षटकार आणि 2 चौकारासह 15 धावावर तर अब्रार अहमद 1 चौकारासह 7 धावावर नाबाद राहिले. न्यूझीलंडतर्फे ब्रेसवेल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 75 धावात 4, साऊदीने 43 धावात 2, सोधीने 59 धावात 2 आणि हेन्रीने 69 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड प. डाव 449, पाक प. डाव 408, न्यूझीलंड दु. डाव 5 बाद 277 डाव घोषित, पाक दु. डाव 90 षटकात 9 बाद 304 (सर्फराज अहमद 118, इमाम उल हक 12, शान मसूद 35, बाबर आझम 27, शकील 32, सलमान 30, हसन अली 5, नसीम शहा नाबाद 15, अब्रार अहमद नाबाद 7, ब्रेसवेल 4-75, साऊदी 2-43, सोधी2-59, हेन्री 1-69).









