सामन्यात 183 धावा : अवांतराचा वाटा 49 : मॅट रो सामनावीर
वृत्तसंस्था/ ईस्ट लंडन
आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी ड गटातील कमी धावसंख्येच्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणचा केवळ एका गड्याने निसटता पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांना तिहेरी धावसंख्या गाठता आली नाही. न्यूझीलंडच्या मॅट रोला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने 21 धावात 5 गडी बाद केले.
या स्पर्धेतील मंगळवारचा हा अकरावा सामना होता. अफगाणने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणचा डाव 21.3 षटकात 91 धावात आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 28.2 षटकात 9 बाद 92 धावा जमवित आपला निसटता विजय नोंदविला.
अफगाणच्या डावामध्ये दोन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. तर त्यांना अवांतराच्या रुपात 25 धावा मिळाल्या. जमशेद झेद्रानने 32 चेंडूत 4 चौकारांसह 22 तर अरब गुलने 20 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 10 धावा केल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली नाही. अफगाणला वाईडच्या रुपात 17 धावा केल्या. तर लेगबाईज 8 असे एकूण 25 धावा अवांतराच्या रुपात मिळाल्या. अफगाणच्या डावात केवळ 11 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे मॅट रोने 21 धावात 5 तर रेयान सोरगेस आणि स्व्रुडेर यांनी प्रत्येकी 2 आणि जॅकसनने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाजही स्थिर राहू शकले नाहीत. त्यांचा निम्मा संघ 42 धावात तंबूत परतला होता. कर्णधार ऑस्कर जॅकसनने 45 चेंडूत 3 चौकारांसह 26 तर स्टॅकपोलने 11 चेंडूत 3 चौकारांसह 12 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावामध्ये 10 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडला अवांतराच्या रुपात 24 धावा मिळाल्या. त्यामध्ये 11 वाईड, 1 नो बॉल आणि 12 लेगबाईजचा समावेश आहे. या संपूर्ण सामन्यामध्ये दोन्ही संघांकडून 183 धावा नोंदविल्या गेल्या आणि त्यामध्ये अवांतर धावांचा वाटा 49 राहिला. अफगाणतर्फे गझनफर 29 धावात 3 तर खलिल अहमद व हरब गुल यांनी प्रत्येकी 2 तसेच नासिर खानने 1 गडी बाद केला. या स्पर्धेतील न्यूझीलंडचा हा दुसरा विजय आहे.
संक्षिप्त धावफलक – अफगाण 21.3 षटकात सर्व बाद 91 (जमशेद झेद्रान 22, अरब गुल 10, अवांतर 25, मॅट रो 5-21, सोरगेस 2-33, स्व्रुडेर 2-15, जॅकसन 1-13), न्यूझीलंड 28.2 षटकात 9 बाद 92 (ऑस्कर जॅकसन 26, स्टॅकपोल 12, अवांतर 24, गझनफर 3-29, खलिल अहमद 2-16, अरब गुल 2-12, नासिर खान 1-17).









