वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरू असलेल्या फिफाच्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात फिलिपिन्सने सहयजमान न्यूझीलंडला अनपेक्षित पराभवाचा धक्का देत विजयी सलामी दिली. या स्पर्धेतील फिलिपिन्सचा हा पहिला विजय आहे.
या स्पर्धेत न्यूझीलंडने पाच दिवसापूर्वी झालेल्या सामन्यात नॉर्वेचा पराभव करत विजयी सलामी दिली होती. फिफाच्या गेल्या सहा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेमध्ये न्यूझीलंड महिला फुटबॉल संघाची कामगिरी दर्जेदार झाल्याने यावेळी या संघाकडे शौकीनांनी संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. पण हा अनपेक्षित धक्कादायक पराभवाने न्यूझीलंडचे समर्थक निराश झाले.
फिलिपिन्स आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात 24 व्या मिनिटाला सारिना बोल्डेनने न्यूझीलंडच्या बचावफळीतील खेळाडूंना तसेच गोलरक्षकाला हुलकावणी हा एकमेव निर्णायक गोल नोंदवला. या सामन्याला सुमारे 33 हजार शौकीन उपस्थित होते. सामन्यातील पहिल्या 20 मिनिटांच्या कालावधीत न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आक्रकम आणि वेगवान खेळावर भर देत फिलिपिन्सवर दबाव आणण्यात यश मिळवले होते पण अनपेक्षितरित्या फिलिपिन्सला मिळालेल्या संधीचा बोल्डेनने पुरेपूर फायदा उठवला. मध्यंतरापर्यंत फिलिपिन्सने 1-0 अशी आघाडी कायम राखली होती. या सामन्यामध्ये फिलिपिन्सने न्यूझीलंडच्या हद्दीत 80 टक्के चेंडू राखला होता. या सामन्यात शेवटच्या 10 मिनिटांमध्ये न्यूझीलंडने गोल करण्याच्या संधी गमावल्या. 68 व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या जॅक्वी हँडने विक्लिन्सनच्या पासवर मारलेला फटका गोलपोस्टच्या दांडीला आदळल्याने न्यूझीलंडची गोल करण्याची संधी हुकली. या सामन्यात फिलिपिन्सला तीन गुण मिळाले आहेत. आता न्यूझीलंडचा या स्पर्धेतील पुढील सामना स्वीत्झर्लंडबरोबर ड्युनेडीन येथे तर फिलिपिन्सचा पुढील सामना नॉर्वेबरोबर ऑकलंड येथे येत्या रविवारी होत आहे.









