दुसऱ्या कसोटीत किवीज संघाचा 1 डाव आणि 359 धावांनी दणदणीत विजय : मालिकेत 2-0 ने यश
वृत्तसंस्था/ बुलावायो
न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेवर अवघ्या अडीच दिवसात दणदणीत विजय मिळवला आहे. यजमान झिम्बाब्वेला पहिल्या डावात 125 धावांत गुंडाळल्यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 601 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर किवींनी झिम्बाब्वेचा दुसरा डाव 117 धावांवर गुंडाळून एक डाव 359 धावांनी विजय मिळवून मालिका 2-0 अशी खिशात घातली. विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा डावाच्या फरकाने मिळवलेला तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. न्यूझीलंडचा झिम्बाब्वे दौरा अपराजित राहिला. त्यांनी टी 20 तिरंगी मालिकेतील सर्व सामने, अंतिम सामना आणि दोन्ही कसोटी सामने जिंकले.
प्रारंभी, झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवीज गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर संपूर्ण संघ 125 धावांत ऑलआऊट झाला. ब्रेडाँन टेलर वगळता इतर झिम्बाब्वेचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. यानंतर प्रत्युत्तरात खेळताना डेव्हॉन कॉनवे (153 धावा), हेन्री निकोल्स (150 धावा) आणि रचिन रवींद्र (165 धावा) यांनी 601 धावा करत डाव घोषित केला. झिम्बाब्वेचा एकही गोलंदाज छाप पाडू शकला नाही. विशेष म्हणजे, किवीज फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. यामुळे त्यांना पहिल्या डावात 476 धावांची आघाडी मिळाली.
झिम्बाब्वेच्या फलंदाजांचे सपशेल लोटांगण
न्यूझीलंडने आपला पहिला डाव 601 धावांत घोषित केल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केली. निक वेल्चने सर्वाधिक 7 चौकारासह नाबाद 47 धावांचे योगदान दिले. कर्णधार क्रेग एर्विनने 17 धावांची खेळी केली. इतर एकाही फलंदाजाला मात्र दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यांचा दुसरा डाव 28.1 षटकांत 117 धावांवर आटोपला. पहिल्या डावात चार विकेट्स घेणाऱ्या फॉल्केसने दुसऱ्या डावातही अप्रतिम स्पेल टाकताना 37 धावांत 5 बळी घेतले. याशिवायण् मॅट हेन्री व जेकब डफी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मालिकेत 16 बळी घेणाऱ्या हेन्रीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 153 धावांची खेळी साकारणाऱ्या डेव्हॉन कॉनवेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे पहिला डाव 125 आणि दुसरा डाव 28.1 षटकांत सर्वबाद 117 (निक वेल्स 47, क्रेग एर्विन 17, मुझारबानी 8, फॉल्केस 37 धावांत 5 बळी, मॅट हेन्री, जेकब डफी प्रत्येकी 2 बळी)
न्यूझीलंड पहिला डाव 3 बाद 601 घोषित.
न्यूझीलंडचा कसोटीतील सर्वात मोठा विजय
झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडने दुसरा कसोटी सामना तब्बल 1 डाव आणि 359 धावांनी जिंकला. या विजयासह किवीज संघाचा हा कसोटीतील सर्वात मोठा विजय ठरला. तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2012 मध्ये, किवींनी नेपियरमध्ये झिम्बाब्वेला एक डाव आणि 301 धावांनी पराभूत केले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये डाव आणि धावांच्या फरकाने विजय
- इंग्लंड – डाव आणि 579 धावांनी विजय वि. ऑस्ट्रेलिया, 1938
- ऑस्ट्रेलिया – डाव आणि 360 धावांनी विजय वि. द. आफ्रिका, 2002
- न्यूझीलंड – डाव व 359 धावांनी विजय वि. झिम्बाब्वे, 2025
- वेस्ट इंडिज – डावा आणि 336 धावांनी वि. भारत, 1958.









