वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन (बार्बाडोस)
न्यूझीलंडने यजमान विंडीजविरुद्धची तीन सामन्यांची वन डे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. रविवारी येथे झालेल्या या मालिकेतील तिसऱया आणि निर्णायक सामन्यात न्यूझीलंडने विंडीजचा 5 गडय़ांनी पराभव केला. न्यूझीलंडच्या टॉम लॅथमला सामनावीर तर मिचेल सँटनरला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांनी 300 धावांचा टप्पा ओलांडला होता. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 50 षटकात 8 बाद 301 धावा जमवित न्यूझीलंडला विजयासाठी 302 धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडने आपल्या परिपूर्ण फलंदाजीच्या जोरावर 47.1 षटकात 5 बाद 307 धावा जमवित विंडीजचे या मालिकेतील आव्हान संपुष्टात आणले. न्यूझीलंडने हा निर्णायक सामना 17 चेंडू बाकी ठेवून जिंकला. विंडीजच्या मेयर्सचे शतक वाया गेले.
या शेवटच्या सामन्यात विंडीजच्या डावात सलामीच्या मेयर्सने 110 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांसह 105 धावा झळकविताना शाय होपसमवेत सलामीच्या गडय़ासाठी 173 धावांची भक्कम भागीदारी केली. होपने 100 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 51 धावा जमविल्या. मेयर्स आणि शाय होप हे पाठोपाठ बाद झाल्यानंतर विंडीजचा डाव कोलमडला. कर्णधार निकोलास पुरनने 55 चेंडूत 9 षटकार आणि 4 चौकारांसह 91, जोसेफने 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 20 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 15 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे बोल्टने 3, सँटनरने 2, साउदी, फर्ग्युसन आणि नीशम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावामध्ये 4 फलंदाजांनी अर्धशतके झळकवली. सलामीच्या ग्युप्टिलने 64 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 57, कॉनवेने 63 चेंडूत 6 चौकारांसह 56, कर्णधार लॅथमने 75 चेंडूत 6 चौकारांसह 69, मिचेलने 49 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 63, तसेच नीशमने 11 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 34 धावा तडकाविल्या. ब्रेसवेलने 1 चौकारासह नाबाद 14 धावा केल्या. न्यूझीलंडच्या डावात 6 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे होल्डर आणि कॅरे यांनी प्रत्येकी 2 तर जोसेफने 1 गडी बाद केला. न्यूझीलंडच्या डावात ग्युप्टिल आणि कॉनवे यांनी दुसऱया गडय़ासाठी 82 धावांची भागीदारी केली. लॅथम आणि मिचेल यांनी चौथ्या गडय़ासाठी 120 धावांची भर घातली. न्यूझीलंडने या शेवटच्या सामन्यात विजय मिळवून मालिका 2-1 अशी हस्तगत केली.
संक्षिप्त धावफलक ः विंडीज 50 षटकात 8 बाद 301 (मेयर्स 105, पुरन 91, होप 51, जोसेफ नाबाद 20, बोल्ट 3-53, सँटनर 2-38, साउदी, फर्ग्युसन, नीशम प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड 47.1 षटकात 5 बाद 307 (ग्युप्टिल 57, कॉनवे 56, लेथम 69, मिचेल 63, नीशम नाबाद 34, ब्रेसवेल नाबाद 14, ऍलेन 3, होल्डर 2-37, कॅरे 2-77, जोसेफ 1-61).









