वृत्तसंस्था/ऑकलंड
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत गुरूवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मार्क चॅपमनच्या जलद अर्धशतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने विंडीजवर केवळ 3 धावांनी निसटता विजय मिळवित 1-1 अशी बरोबरी साधली आहे. विंडीजने यापूर्वी सदर मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी मिळविली होती. ‘सामनावीर’ चॅपमनने 28 चेंडूत 7 षटकार आणि 6 चौकारांसह 78 धावा झोडपल्या. या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 207 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 8 बाद 204 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना थोडक्यात गमवावा लागला. न्यूझीलंडच्या डावामध्ये चॅपमनने 78 धावांची वेगवान आणि जलद खेळी केली. सलामीच्या रॉबिनसनने 25 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 39, कॉन्वेने
24 चेंडूत 1 षटकारासह 16, रचिन रवींद्रने 15 चेंडूत 11, मिचेलने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 28, ब्रेसवेलने 1 चौकारासह 5, कर्णधार सँटेनरने 8 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. विंडीजतर्फे चेसने 2 तर सील्स, फोर्ड, शेफर्ड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडच्या डावात पहिल्या 6 षटकांत 47 धावा जमविताना एकही गडी बाद झाला नाही. न्यूझीलंडचे अर्धशतक 37 चेंडूत तर शतक 77 चेंडूत, दीड शतक 94 चेंडूत आणि द्विशतक 119 चेंडूत नोंदविले गेले. चॅपमनने 19 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. रॉबिनसन आणि कॉन्वे यांनी 55 धावांची सलामीच्या गड्यासाठी भागिदारी केली. चॅपमन आणि मिचेल यांनी चौथ्या गड्यासाठी 57 धावांची भर घातली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावामध्ये अॅथनेझ आणि कर्णधार होप यांनी दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी संघाचे खाते उघडण्यापूर्वी न्यूझीलंडच्या डफीने सलामीच्या किंगला खाते उघडण्यापूर्व झेलबाद केले. सोधीने ऑगेस्टीला 7 धावांवर झेलबाद केले. होल्डरने 8 चेंडूत 2 षटकारांसह 16, पॉवेलने 16 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकारांसह जलद 45, चेसने 1 चौकारांसह 6, शेफर्डने 16 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारांसह 34, फोर्डने 13 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 29 धावा केल्या. विंडीजने 20 षटकात 8 बाद 204 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना या सामन्यात निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. विंडीजच्या डावात 18 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे सोधी आणि कर्णधार सँटनर यांनी प्रत्येकी 3 तर डफी व जेमिसन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 36 धावा जमविताना 1 गडी गमविला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 20 षटकात 5 बाद 207 (चॅपमन 78, रॉबिनसन 39, कॉन्वे 16, रवींद्र 11, मिचेल नाबाद 28, ब्रेसवेल 5, सँटनर नाबाद 18, अवांतर 12, चेस 2-33, फोर्ड, होल्डर, शेफर्ड प्रत्येकी 1 बळी), विंडीज 20 षटकात 8 बाद 204 ( अॅथनेझ 33, होप 24, होल्डर 16, पॉवेल 45, शेफर्ड 34, फोर्ड नाबाद 29, अवांतर 9, सोधी व सँटनर प्रत्येकी 3 बळी, डफी, जेमिसन प्रत्येकी 1 बळी).









