विल यंग सामनावीर, लंकेची थेट पात्रतेची संधी हुकली
वृत्तसंस्था /हॅमिल्टन
येथे शुक्रवारी झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दिवस-रात्रीच्या शेवटच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने लंकेचा 6 गड्यांनी दणदणीत पराभव करून ही मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. न्यूझीलंडच्या विल यंगला सामनावीर, हेन्री शिपलेला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने लंकन संघाने यावर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रतेची संधी गमावली. या शेवटच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 41.3 षटकात 157 धावात आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 32.5 षटकात 4 बाद 159 धावा जमवित हा सामना जिंकला. लंकेच्या निशांकाचे अर्धशतक वाया गेले. लंकेच्या डावामध्ये सलामीच्या निशांकाने 64 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 57 धावा जमविल्या. एकेरी धाव घेण्याच्या नादात तो धावचीत झाला. धनंजय डिसिल्वाने 2 चौकारांसह 13, कर्णधार शनाकाने 36 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 31, करुणारत्नेने 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. कुशल मेंडीस तसेच मॅथ्यूज आणि हसरंगा यांना मात्र खाते उघडता आले नाही. लंकेच्या डावात 3 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री, शिप्ले आणि डॅरिल मिचेल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विल यंगच्या दणकेबाज नाबाद अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने हा सामना आरामात जिंकला. बोवेस आणि ब्लंडेल हे पहिले दोन फलंदाज केवळ 6 धावात बाद झाल्यानंतर विल यंगने समयोचित फलंदाजी केली. दरम्यान, मिचेल आणि कर्णधार लॅथम हे अनुक्रमे 6 आणि 8 धावांवर बाद झाल्याने न्यूझीलंडची स्थिती यावेळी 4 बाद 59 अशी होती. यंगला निकोल्सकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने 18 षटकात अभेद्य 100 धावांची भागीदारी करून विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. यंगने 113 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 86 तर निकोल्सने 52 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 44 धावा झळकविल्या. लंकेतर्फे कुमाराने 2 तर रजिता व शनाका यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या पराभवामुळे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत थेट पात्रतेचे शेवटचे स्थान गमावले. विंडीजने पात्रफेरीमध्ये 88 मानांकन गुण नोंदविले आहेत. लंकेने 81 गुण नोंदविले आहेत. आता विश्वचषक स्पर्धेसाठीच्या पात्रतेसाठी लंकन संघाला येत्या जून महिन्यात झिम्बाब्वेत होणाऱ्या पात्रफेरीच्या स्पर्धेत खेळावे लागणार आहे.
संक्षिप्त धावफलक
लंका 41.3 षटकात सर्वबाद 157 (निशांका 57, डिसिल्वा 13, शनाका 31, करुणारत्ने 24, अवांतर 12, हेन्री 3-14, शिप्ले 3-32, मिचेल 3-32), न्यूझीलंड 32.5 षटकात 4 बाद 159 (यंग नाबाद 86, निकोल्स नाबाद 44, बोवेस 1, ब्लंडेल 4, मिचेल 6, लॅथम 8, अवांतर 10, कुमारा 2-39, रजिता 1-44, शनाका 1-25).