वृत्तसंस्था/ एडीनबर्ग
रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या एकमेव वनडे सामन्यात मार्क चॅपमनच्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने यजमान स्कॉटलंडचा 7 गडय़ांनी दणदणीत पराभव केला.
न्यूझीलंडच्या मार्क चॅपमनने गेल्या शुक्रवारी स्कॉटलंड विरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात 83 धावांची खेळी करत आपल्या संघाला 102 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला होता. रविवारी झालेल्या एकमेव वन डे सामन्यात चॅपमनने नाबाद 101 धावा झळकविल्या. 28 वषीय चॅपमनने डॅरियल मिचेलसमवेत चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 175 धावांची भागीदारी केली. मिचेलने नाबाद 74 धावा झळकविल्या. न्यूझीलंडने 50 षटकात 3 बाद 307 धावा जमवित स्कॉटलंडचा 25 चेंडू बाकी ठेवून 7 गडय़ांनी पराभव केला.
तत्पूर्वी स्कॉटलंडने 50 षटकात 306 धावा झळकविल्या होत्या. चॅपमनचे वनडे क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. 2015 साली संयुक्त अरब अमिरातविरुद्ध त्याने नाबाद 124 धावा झळकविल्या होत्या. रविवारच्या एकमेव वनडे सामन्यात न्यूझीलंडतर्फे मार्टिन गुप्टीलने 47 तर ऍलनने 50 धावा जमविल्या. तत्पूर्वी स्कॉटलंडच्या डावामध्ये लिसेकने 85 धावा झळकविताना मॅथ्यू क्रॉससमवेत 92 धावांची भागीदारी केली होती. क्रॉसने 53 धावा झळकविल्या. स्कॉटलंडची एकवेळ स्थिती 5 बाद 107 अशी केविलवाणी झाली होती. पण त्यानंतर लिसेक आणि क्रॉस यांच्या शानदार फलंदाजीमुळे त्यांना 306 धावांपर्यंत मजल मारता आली. अष्टपैलू लिसेकने 55 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांसह 85 धावा झळकविल्या. न्यूझीलंडतर्फे मिचेल ब्रेसवेल आणि डफी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
स्कॉटलंड 50 षटकात सर्वबाद 306 (लिसेक 85, क्रॉस 53, ब्रेसवेल आणि डफी प्रत्येकी 3 बळी), न्यूझीलंड 45.5 षटकात 3 बाद 307 (चॅपमन नाबाद 101, मिचेल नाबाद 74).









