विश्वचषक स्पर्धा : विद्यमान विजेत्यांवर 9 गड्यांनी दणदणीत विजय, कॉनवे, रचिन रवींद्र यांची नाबाद शतकांसह विक्रमी भागीदारी, हेन्री-फिलिप्स-सँटनरचा भेदक मारा, रूटचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था /अहमदाबाद
देव्हॉन कॉनवे आणि सामनावीर रचिन रवींद्र यांच्या शानदार नाबाद शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी पहिल्याच सामन्यात विद्यमान विजेत्या इंग्लंडला दणदणीत पराभवाचा दणका दिला. न्यूझीलंडने 2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड केली. न्यूझीलंडने इंग्लंडचा 9 गड्यांनी एकतर्फी पराभव करत विजयी सलामी दिली. कॉनवे आणि रवींद्र यांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 273 धावांची भागीदारी केली. कॉनवेने नाबाद 152 तर रवींद्रने नाबाद 123 धावा झोडपल्या.
या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर धावांची गती बऱ्यापैकी राखली. 50 षटकात इंग्लंडने 9 बाद 282 धावा जमवल्या. कर्णधार लॅथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शेवटच्या 25 षटकांच्या खेळामध्ये इंग्लंडच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखण्यात यश मिळवले. इंग्लंडच्या डावामध्ये अनुभवी फलंदाज रुटने 86 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 77 धावा झळकवल्या. या विश्वचषकात पहिले अर्धशतक नोंदवण्याचा मान त्याने मिळविला. कर्णधार बटलरने 42 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 43, बेअरस्टोने 35 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 33, ब्रुकने 16 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 25, लिव्हिंगस्टोनने 3 चौकारासह 20 धावा जमवल्या. रुट आणि बटलर यांनी पाचव्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली. इंग्लंडने पहिल्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये 51 धावा जमवताना एक गडी गमवला. इंग्लंडचे पहिले अर्धशतक 60 चेंडूत नेंदवले गेले. इंग्लंडने 30 षटकामध्ये 173 धावा जमवताना 5 गडी गमवले. इंग्लंडचे शतक 105 चेंडूत तर दीडशतक 162 चेंडूत फलकावर लागले. रुटने 57 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडचे द्विशतक 210 चेंडुत नोंदवले गेले. तिसऱ्या पॉवर प्लेमधील शेवटच्या 10 षटकामध्ये इंग्लंडने 58 धावा जमवताना तीन गडी गमवले. इंग्लंडच्या 250 धावा 268 चेंडूत नेंदवल्या गेल्या. न्यूझीलंडतर्फे हेन्रीने 48 धावात 3, सँटनरने 37 धावात 2, फिलिप्सने 17 धावात 2, बोल्टने 48 धावात एक तर रचिन रवींद्रने 76 धावात एक गडी बाद केला. इंग्लंडच्या डावामध्ये 6 षटकार आणि 21 चौकार नोंदवले गेले. न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी या खेळपट्टीवर प्रभावी गोलंदाजी केली. रचिन रवींद्रची गोलंदाजी महागडी ठरली. ब्रुकने त्याच्या एका षटकामध्ये 2 चौकार आणि एक षटकार खेचला पण रवींद्रने ब्रुकला कॉनवेकरवी झेलबाद केले. इंग्लंडने मोईन अलीला फलंदाजीत बढती दिली पण ती परिणामकारक ठरली नाही. या सामन्यात इंग्लंडला बेन स्टोक्सची उणीव चांगलीच भासली.
न्यूझीलंडच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील दुसऱ्याच षटकात पहिल्याच चेंडूवर सॅम करनने सलामीच्या यंगला बटलरकरवी झेलबाद केले. यंगला खातेही उघडता आले नाही. इंग्लंडला लवकर यश मिळाले तरी रचिन व कॉनवे यांनी त्यांचे सारे मनसुबे उधळून लावत विक्रमी अभेद्य 273 धावांची भागीदारी केली. विश्वचषकातील त्यांची ही कोणत्याही गड्यासाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. कॉवे आणि रचिन यांनी सुरुवातीला चेंडूवर नजर बसेपर्यंत एकेरी आणि दुहेरी धावावर अधिक भर दिला. त्यानंतर त्यांनी आक्रमक फटकेबाजी सुरु केली. न्यूझीलंडने पहिल्या पॉवर प्लेत 81 धावा झोडपताना एक गडी गमवला. न्यूझीलंडचे पहिले अर्धशतक 41 चेंडूत नोंदवले गेले. आर. रवींद्र आणि कॉनवे यांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 39 चेंडूत नोंदवली. न्यूझीलंडने दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 202 धावा झोडपल्या. रचिन रवींद्रने आपले अर्धशतक 36 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने झळकवले. न्यूझीलंडचे शतक 73 चेंडूत फलकावर लागले. कॉनवेने 36 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह अर्धशतक झळकवले. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी 75 चेंडूत नोंदवली. रवींद्र आणि कॉवे यांनी दुसऱ्या गड्यासाठी दीडशतकी भागीदारी 117 चेंडूत झळकवली. कॉनवेने 83 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारासह शतक झळकवले. न्यूझीलंडचे द्विशतक 161 चेंडूत नोंदवले गेले. कॉनवे आणि रवींद्र यांनी द्विशतकी भागीदारी 171 चेंडूत नोंदवली. रवींद्रने 82 चेंडून 4 षटकार आणि 9 चौकारासह शतक झळकवले. या जोडीने 250 धावांची भागीदारी 202 चेंडूत केली. कॉनवेने आपले दीडशतक 119 चेंडूत 3 षटकार आणि 19 चौकारांच्या मदतीने झळकवले. न्यूझीलंडने 36.2 षटकात 1 बाद 283 धावा जमवत इंग्लंडचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. कॉनवे 121 चेंडूत 3 षटकार आणि 19 चौकारांसह 152 तर रवींद्र 96 चेंडूत 5 षटकार आणि 11 चौकारांसह 123 धावांवर नाबाद राहिले. न्यूझीलंडच्या डावात 8 षटकार आणि 30 चौकार नोंदवले गेले. इंग्लंतर्फे करनने 47 धावात एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 50 षटकात 9 बाद 282 (रुट 77, बटलर 43, बेअरस्टो 33, ब्रुक 25, लिव्हिंगस्टोन 20, आदिल रशीद नाबाद 15, सॅम करन 14, वूड नाबाद 13, मोईन अली 11, अवांतर 6, मॅट हेन्री 3-48, सँटनर 2-37, फिलिप्स 2-17, बोल्ट 1-48, रवींद्र 1-76).
न्यूझीलंड 36.2 षटकात 1 बाद 283 (देव्हॉन कॉनवे 121 चेंडूत 3 षटकार आणि 19 चौकारांसह नाबाद 152, यंग 0, रचिन रवींद्र 96 चेंडूत 5 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 123, अवांतर 8, सॅम करन 1-47).









