वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या लढतीत न्यूझीलंडने यजमान इंग्लंडचा 74 धावांनी पराभव करत आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. या मालिकेत इंग्लंडने पहिले सलग दोन सामने जिंकून न्यूझीलंडवर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या फिन अॅलेनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 202 धावा जमवित इंग्लंडला विजयासाठी 203 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव 18.3 षटकात 128 धावात आटोपल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये अॅलेन आणि फिलिप्स यांनी दमदार अर्धशतके झळकाविली. अॅलेनने 53 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांसह 83 तर फिलिप्सने 34 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह 69 धावा झोडपल्या. कॉन्वेने 1 चौकारासह 9, सिफर्टने 1 चौकारासह 19, चॅपमनने 7 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 8, मिचेलने 4 चेंडूत 1 चौकारासह 8 धावा जमविल्या. फिलिप्स आणि अॅलेन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 88 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडच्या डावात 11 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 48 धावा जमविताना 1 गडी गमाविला. न्यूझीलंडचे पहिले अर्धशतक 40 चेंडूत, शतक 73 चेंडूत, दीडशतक 98 चेंडूत तर द्विशतक 120 चेंडूत फलकावर लागले. अॅलेनने 35 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक तर फिलिप्सने 27 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. इंग्लंडतर्फे अॅटकिनसनने 31 धावात 2 तर वूड आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध आणि भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. इंग्लंडच्या 4 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. कर्णधार बटलरने 21 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 40 तर मोईन अलीने 16 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 26, जॅक्सने 2 चौकारांसह 11, बेअरस्टोने 16 चेंडूत 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 5 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात इंग्लंडने 30 धावा जमविताना 2 गडी गमाविले. इंग्लंडचे अर्धशतक 47 चेंडूत तर शतक 84 चेंडूत फलकावर लागले. न्यूझीलंडतर्फे जेमिसन आणि सोधी यांनी प्रत्येकी 3, साऊदीने 2 तसेच हेन्री आणि सँटेनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेतील चौथ आणि शेवटचा सामना मंगळवारी खेळविला जात असून न्यूझीलंडचा संघ ही मालिका बरोबरीत राखण्यासाठी प्रयत्न करेल. या मालिकेनंतर उभय संघात 4 सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. सध्या सुरु असलेल्या टी-20 मालिकेत इंग्लंडने पहिला सामना 7 गड्यांनी तर दुसरा सामना 95 धावांनी जिंकला होता.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकात 5 बाद 202 (अॅलेन 53 चेंडूत 6 षटकार 4 चौकारांसह 83, फिलिप्स 34 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह 69, सिफर्ट 1 चौकारासह 19, अॅटकिनसन 2-31, वूड 1-36, लिव्हिंगस्टोन 1-55), इंग्लंड 18.3 षटकात सर्व बाद 128 (बटलर 3 षटकार 3 चौकारांसह 21 चेंडूत 40, मोईन अली 16 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 26, बेअरस्टो 1 चौकारासह 12, जॅक्स 2 चौकारांसह 11, अवांतर 6, जेमिसन 3-23, सोधी 3-33, साऊदी 2-30, हेन्री 1-21, सॅन्टेनर 1-20).









