वृत्तसंस्था/ सिल्हेत
यजमान बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या कसोटी मालिकेत बांगलादेशचे अनेक अव्वल क्रिकेटपटू सहभागी होणार नाहीत पण ही कसोटी मालिका न्यूझीलंडची सत्त्वपरीक्षा पाहणारी ठरेल, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.
या कसोटी मालिकेत बांगलादेशचा नियमित कर्णधार शकीब अल हसन, वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद आणि इबादोत हुसेन दुखापतीमुळे सहभागी होणार नाहीत. तर लिटॉन दास कांही वैयक्तिक समस्येमुळे या मालिकेसाठी उपलब्ध राहणार नसल्याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. सदर मालिका बांगलादेशमध्ये होत असल्याने साहजिकच यजमान संघाला अधिक प्रतिसाद मिळेल. त्यामुळे न्यूझीलंड संघाला या कसोटी मालिकेत विजयासाठी कडवी लढत द्यावी लागेल, असे साऊदीने म्हटले आहे. आता बांगलादेश संघाचे या मालिकेत नेतृत्त्व नजमुल हुसेन शांतोकडे सोपविण्यात आले आहे. अनुभवी शकीब अल हसन आणि लिटॉन दास यांची उणीव बांगलादेश संघाला चांगलीच भासेल. 2023-24 च्या आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दृष्टीकोनातून दोन्ही संघांना ही मालिका महत्त्वाची राहील. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाने आपली फिरकी गोलंदाजीची बाजू अधिक मजबूत केली आहे. इश सोधी, मिचेल सँटेनर आणि अझाज पटेल हे या संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज आहेत. रचिन रविंद्र आणि फिलिप्स हे सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये असून त्यांची अष्टपैलू कामगिरी चांगली होईल अशी आशा सोधीने व्यक्त केली आहे. न्यूझीलंड संघाकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज असल्याने या मालिकेत त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहील. बांगलादेश दौऱ्यातील या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी कसून सराव केला आहे









