वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
न्यूझीलंड महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू थॅमीसन न्यूटनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूटनने आपल्या 14 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत 10 वनडे आणि 15 टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले.
2016 च्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या न्यूझीलंडने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. विंडीजच्या महिला संघाने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. न्यूझीलंडच्या या सामन्यामध्ये न्यूटनचा समावेश होता. अष्टपैलू न्यूटनने 10 वनडे सामन्यात 11 बळी मिळविले आहेत. तसेच 2016 साली पाकविरुद्धच्या सामन्यात तिने 5 गडी बाद केले होते. न्यूटनने 15 टी-20 सामन्यात 9 गडी बाद केले आहेत. न्यूटनने 2017 साली आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्यानंतर तिने तीन टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले होते.









