संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांची घोषणा, तिन्ही सुरक्षा दलांची क्षमता वाढविण्यावर भर देणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नूतन वर्ष 2025 हे संरक्षण विभाग सुधारणा वर्ष म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केली आहे. या वर्षात भूदल, वायुदल आणि नौदल या संरक्षण दलांची युद्ध क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या तीन्ही दलांमध्ये उत्कृष्ट समन्वय रहावा, यासाठीची यंत्रणा आणि व्यवस्था अधिक बळकट करण्याकडे विशेष लक्ष पुरविले जाणार आहे. तीन्ही दले अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे आणि युद्धस्थितीत राखणे याकडे सर्वाधिक लक्ष दिले जाणार आहे, असे राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले आहे.
सेनादले अत्याधुनिक बनविण्यासाठी शस्त्रखरेदी प्रक्रिया अधिक सुलभ केली जाणार आहे. सेनादलांना शस्त्रे आणि अस्त्रे यांची उणीव भासू नये आणि कोणत्याही आव्हानांचा केव्हाही स्वीकार करण्यास दले सज्ज रहावीत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. त्यामुळे या वर्षात काही नव्या योजनाही लागू केल्या जाणार आहेत. युद्धसज्जतेत आपली सेनादले अग्रेसर रहावीत अशी व्यवस्था याच वर्षी करण्यात येईल, अशी माहिती राजनाथसिंग यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
एकात्म आज्ञापनावर भर
तीन्ही सेनादलांची एकात्म आज्ञापन व्यवस्था अधिक बळकट केली जाणार आहे. ही व्यवस्था ‘थिएरटायझेशन’ म्हणून ओळखली जाते. या व्यवस्थेअंतर्गत भूदल, वायुदल आणि नौदल यांच्या क्षमतांचे एकत्रीकरण (इंटिग्रेशन) करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे युद्धाचा प्रसंग ओढविल्यास तीन्ही सेनादलांना एकमेकांशी सहकार्य करुन युद्धनिती निर्धारित करणे आणि ती कार्यान्वित करणे सुलभ होते. तीन्ही दलांनी एकात्म पद्धतीने एकच दल असल्याप्रमाणे कार्य करणे हे या व्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्या आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.
कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग
कृत्रिम बुद्धीमत्ता हे नव्या युगाचे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग संरक्षण क्षेत्रात करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे अवकाश तंत्रज्ञान, संगणकीय सायबर तंत्रज्ञान यांचाही उपयोग अधिकाधिक प्रमाणात करुन तीन्ही सैन्यदले अत्याधुनिक पद्धतीने सज्ज करण्यावर भर दिला जाणार आहे. यंत्रज्ञान (मशिन लर्निंग), हायपरसॉनिक किंवा स्वनातीत तंत्रज्ञान आणि यंत्रमानवी तंत्रज्ञान आदी नव्या तंत्रज्ञानांचा समावेश संरक्षण विभागात कसा करता येईल, यावर विषेश लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती राजनाथसिंग यांनी दिली आहे.
बहुलक्षी आक्रमण क्षमता
तीन्ही सेना दलांच्या एकात्म कार्यान्वयनाप्रमाणेच बहुलक्षी आक्रमण क्षमता विकसीत करण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. युद्धकाळात एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर आघात करणे, शत्रूचे लक्ष त्यायोगे विचलीत करणे आदी तंत्रांचा उपयोग अधिकाधिक सक्षमतेने कसा करता येईल, याचा अभ्यास केला जाणार आहे. नूतन वर्षात भारतीय सेनेमध्ये अमूलाग्र परिवर्तन होऊन ती एकाचवेळी अनेक आव्हानांना तोंड देण्यास सज्ज असावी हे सुनिश्चित केले जाणार आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले.









