अंगणवाडी सेविकांवर मतदार नोंदणीची जबाबदारी
बेळगाव : नवीन मतदारांसाठी नावनोंदणी मोहीम राबविण्यात आली आहे. 18 वर्षांवरील प्रौढांची नोंदणी करून घेतली जात आहे. अंगणवाडी सेविकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी तालुका, जिल्हा पंचायत आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली आहे. 18 वर्षांवरील बरेच जण मतदानापासून वंचित राहत आहेत. यासाठी तहसीलदार कार्यालयामार्फत ही मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत नव्या मतदारांची नोंदणी केली जात आहे. काही मतदारांच्या नावात, पत्त्यात आणि इतर दुरुस्ती केली जात आहे. शुक्रवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ही नोंदणी सुरू आहे. नव्या मतदारांची नेंदणी करताना शाळेचा दाखला, आधार कार्ड, छायाचित्र, रहिवासी दाखला आदी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा तहसीलदार कार्यालयातही नवीन मतदार नोंदणी सुरू आहे.
18 वर्षांहून अधिक असलेल्या तरुण-तरुणींची संख्या अधिक आहे. मात्र, जागृतीअभावी बहुतांश तरुणांकडे मतदान कार्डे नाहीत. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. निवडणूक तोंडावर आली की मतदान कार्डासाठी धडपड सुरू होते. त्यामुळे ऐन वेळेला गोंधळ उडतो. यासाठी नव मतदारांनी आपल्या नावाची नोंद करून मतदार कार्डे मिळावावीत, असे आवाहनही तहसीलदार कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांवर विविध कामांचा ताण वाढू लागला आहे. त्यामुळे दैनंदिन शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अंगणवाडीबरोबर समीक्षा सर्व्हे, गर्भवती महिलांची नोंद, यासह इतर शासकीय कामांसाठी अंगणवाडी सेविकांना जुंपले होते. त्यातच आता नवीन मतदार नोंदणीची कामेदेखील सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे शैक्षणिक अंगणवाडींचा डोलारा विस्कळीत होऊ लागला आहे.









