महिला सांभाळत आहेत ऑफिस : पती नोकरी सोडून करतोय मुलांची देखभाल,1 वर्षात 14 हजार पुरुषांनी सोडला जॉब

सिंगापूरमध्ये एक नवा आणि अजब ट्रेंड दिसून येतोय. तेथे पत्नी नोकरी करत असून पती स्वतःचा जॉब सोडून घरदार सांभाळण्याची जबाबदारी घेत आहे. सिंगापूरच्या मनुष्यबळ मंत्रालयानुसार मागील एक वर्षात घराच्या जबाबदाऱयांसाठी नोकरी सोडणाऱया पुरुषांची संख्या 14,100 इतकी राहिली आहे.
दांपत्यापैकी दोघांनीही काम करणे सुरू ठेवले असते तर वेतनाचा मोठा हिस्सा त्यांना चाइल्डकेअरवर खर्च करावा लागला असता. याऐवजी पुरूष आता स्वतःच्या मुलांना सांभाळत घराची देखरेख करत आहेत. सुमारे 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 च्या तुलनेत (6700) हे प्रमाण दुप्पट आहे. तेव्हा कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासाठी 6,700 पुरुषांनी नोकरी सोडली होती. परंतु महिलांमध्ये हा ट्रेंड उलटा आहे.
कौटुंबिक कारणांमुळे नोकरी सोडणाऱया महिलांच्या संख्येत एक दशकात 27 टक्क्यांची घसरण झाली आहे. 2011 मध्ये कौटुंबिक जबाबदारीकरता 3,28,400 महिलांनी नोकरी सोडली होती. तर 2021 मध्ये हा आकडा 2,39,100 इतका खाली आला आहे. हा डाटा लैंगिक समानता किंवा जेंडर इक्वॅलिटीच्या दिशेने संकेत देतो. कौटुंबिक जबाबदारी निश्चित करताना नेहमी पत्नीच घराची जबाबदारी सांभाळेल हे आवश्यक नाही असे तज्ञांचे मानणे आहे.
महामारीचाही परिणाम
पुरुष घरात राहणे पसंत करत आहेत. काहीजण पत्नीची नोकरी अधिक चांगली असल्याने अशाप्रकारचा निर्णय घेत आहेत. समाज जसजसा अधिक लैंगिक समानतेवर जोर देऊ लागतो आणि महिलांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करतो, पुरुष घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी स्वतःचे काम सोडण्यास सहजपणे तयार होताना दिसून येतात असे विधान सेंटर फॉर फॉदरिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन टॅन यांनी केले आहे. याचबरोबर महामारीदरम्यान कॉर्पोरट कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्याने पुरुषांना घरात राहणे भाग पडे आहे. यातील काही पुरुष पार्ट टाइम जॉब करून कमाई करत आहेत. तर काही जणांनी नोकरी मिळेल ही आशाच सोडून दिली आहे. महिला आर्थिक संकटाला तोंड देण्यास अधिक सक्षम असतात. त्यांनी मंदीलाही पुरुषांच्या तुलनेत अधिक चांगल्याप्रकारे झेलले असल्याचे तज्ञांचे मत आहे.
सिंगापूरमध्ये 13.1 टक्के महिला सीईओ
सिंगापूरमध्ये 25-32 या वयोगटात पुरुषांच्या तुलनेत अधिक संख्येत महिला महाविद्यालयीन आणि एमबीए पदवी प्राप्त करत आहेत. तेथील कार्यबळात 13.1 टक्के महिला सीईओ आहेत. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. 2021 मध्ये सर्व सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकांमध्ये 26 टक्के महिला होत्या. 2019 मध्ये हा आकडा केवळ 15 टक्के होता.









