सत्तेत होते तेव्हा काँग्रेसची फडणवीसी आपल्याकडे यावी या दुराग्रहाने नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार गोत्यात आणले. आता त्यांच्या पदाधिकाऱयांनी सत्यजित तांबेंच्या एबी फॉर्मचा घोळ घातला. नानांच्या धडाडीबद्दल कोणालाही शंका नाही. पण, ते दुसरे नाशिकराव तिरपुडे ठरु लागलेत. स्वपक्षीय आणि मित्र पक्षांच्या विषयी काहीही बोलणे, प्रत्येक गोष्ट माध्यमांसमोर मांडणे यामुळे नानांच्या नावाने ठणाणा सुरू झाला आहे. हा दोष दूर झाला नाही तर भविष्यात महाराष्ट्रात ढवळाढवळ करणारे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल आणि प्रभारी एच.के. पाटीलसुद्धा अडचणीत येतील.

नाशिकच्या पदवीधर उमेदवारी बाबतीत नेमके चुकले कुणाचे? हे गूढ बनलेले आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या खुलाशानंतर तांब्याचे पितळ अचानक चमकू लागले आणि काँग्रेसचे नेतेच विशेषतः नाना आणि एच. के. पाटील संशयाच्या पिंजऱयात उभे केले गेले. पण आता सगळे शेकत आहे ते नानांवर. मुळात हे निश्चित आहे की, तांबे पिता-पुत्रांनी जी ऍडजेस्टमेंट केली होती, त्यात भाजप नेत्यांना पटवणे आणि आपली आमदारकी टिकवणे याला प्राधान्य होते. भाजपमध्ये राजेंद्र विखे-पाटील यांना ऐनवेळी थांबवण्यात आले.

भाजपने इथे आपला उमेदवारही दिला नाही. हे आजच्यासारख्या काळात सहजासहजी घडत नाही हे कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीत दिसत आहेच. पण, या सगळय़ा घडामोडीत नाना पटोले खलनायक ठरले. त्याचीही काही कारणे आहेत. त्यांनी भाच्याच्या निमित्ताने मामाची शिकार करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे सचिव वेणूगोपाल आणि प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी त्यांना पाहिजे ते करण्याची मोकळीक दिली. आता नाना, प्रदेश सचिवाने एबी फॉर्म देण्यात धांदल केली अशी सारवासारव करत आहेत. पण, नाना पदावर आले आणि त्यांनी अशीच मंडळींना सचिव, उपाध्यक्ष ते अगदी प्रवक्ते पदापर्यंत बसवले. अतुल लोंढे यांना प्रमुख प्रवक्ते करताना त्यापूर्वी चिवटपणे भाजप विरोधात मोहीम उघडणाऱया सचिन सावंत यांना त्यांनी गुंडाळून ठेवले. असे अनेक पदांच्याबाबतीत घडले असून त्यामुळे राज्यभर गटबाजीला चालना मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील नेते म्हणजे तालेवार अशी भूमिका ठेवून नाना वागतात आणि त्याच वेळी विदर्भातील नेत्यांशी सुद्धा त्यांचे जमत नाही. मग त्याचा स्फोट कधी ना कधी होणारच होता. जेव्हा गाडी गतीने धावत असते तेव्हा त्यावर कोणी आक्षेप घेत नाही. पण, जेव्हा ती खड्डय़ात जाते तेव्हा चालकाला दोष दिला जातो. पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून कोणी विरोध केला नाही.
मात्र त्यानंतर सत्ता गेल्याचे खापर जे त्यांच्या डोक्मयावर फुटले त्यामुळे त्यांना अजून काँग्रेसमध्ये संधी मिळत नाही. उलट प्रत्येक वेळी ते एकाकी पडलेले दिसतात. नाना पटोले यांची वाटचाल त्या दिशेने सुरू झाली आहे. ते एकटे पडतील अशी चिन्हे आहेत. पण केवळ नानांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार की बाळासाहेब थोरात यांचे विधिमंडळ नेतेपदही जाणार? हा सध्या चर्चेचा विषय आहे. हुबळीहून घाई घाईने एच. के. पाटील विमानाने मुंबईत येऊन पूर्ण दिवस खर्च करणार आहेत. दुसऱया दिवशी दुपारपर्यंत सर्वांशी बोलून वातावरण शांत करून बेंगळूरला जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आणि सुनील केदार ते अशोक चव्हाणांसह अनेक काँग्रेस नेते रोखठोक बोलू लागल्यानंतर महासचिव हडबडले आहेत. मुंबईतून बेंगळूरला जाता जाता ते पक्षश्रे÷ाrंना काय अहवाल पाठवतात याची सर्वांना उत्सुकता
असेल.
छत्तीसगडमध्ये होणाऱया काँग्रेसच्या अधिवेशनानंतर पक्षातील पदांची खांदेपालट होऊ शकते. नवे प्रदेशाध्यक्ष कोण असतील यावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे. पण, तोंडावर असलेल्या निवडणुका लक्षात घेतल्या तर जो खर्च करू शकेल आणि राज्यात पक्षासाठी पैसे उभा करण्याची ज्याच्याजवळ धमक असेल अशाच नेत्याला पद देण्यास काँग्रेस प्राधान्य देऊ शकेल. चिडलेल्या नेत्यांना थंड करणे, पक्षाच्या बाजूने बोलतात म्हणून नानांना इतरत्र संधी देणे आणि त्यांच्या जागी सर्वमान्य (खर्च करणारा) नेता देणे ही कसरत पक्षाला करावी लागण्याची शक्मयता आहे. अध्यक्षांमार्फत नवे बदल काँग्रेस जाहीर करेल पण तोपर्यंत वातावरण शांत करण्यावर त्यांचा भर असेल. बाकी शिवसेना आणि राष्ट्रवादीने केलेले आरोप आणि त्याबाबत केवळ अतुल लोंढे यांनी नानांची केलेली पाठराखण, नाना एकाकी पडल्याचीच साक्ष देतात.
शिबिर नाशिकात, शाह कोल्हापुरात
भाजपने आपले राज्यस्तरीय शिबिर नाशिक जिह्यात आयोजित केले आहे. पक्षाच्या पुढील निवडणुकांच्या वाटचालीची येथे चर्चा होईल. त्र्यंबकेश्वरला शिवलिंगावर बर्फ ठेवून अमरनाथ प्रकटल्याचा गहजब माजवणाऱया पुजाऱयांचा बनाव इथे उघडकीस आला आहे. एरवी बडेजाव मारणाऱया भाजप नेत्यांचा फुगा विधान परिषद निवडणुकीमध्ये फुटला आहे. त्यामुळे पिंडी शेजारच्या या पुजाऱयांबाबत राज्याच्या शिबिरात बोलण्याचे धाडस कोण दाखवेल? हा प्रश्नच आहे. शिंदे गटाशी भाजप नेत्यांचे बिनसलेले उघडकीस येत आहे.
वरळीच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेचा फियास्को झाला. फडणवीस न आल्याने गर्दी झाली नाही असे किरण पावसकर यांना वाटते, यातच सगळे आले. याच काळात शिवजयंती दिवशी भाजप अध्यक्ष अमित शाह कोल्हापूर दौऱयावर आहेत आणि तिथे शिवसेनेतून फुटुन आलेल्या दोन्ही खासदारांऐवजी भाजपचे खासदार निवडून आले पाहिजे हा त्यांचा आदेश आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल याच्या पलीकडे भाजपकडून तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. पण, याला शितावरून भाताची परीक्षा मानावी का? हा प्रश्न आहे.
शिवराज काटकर








