देशभर आणि महाराष्ट्रात रक्षाबंधनाचा सण पार पडला. यंदा लाडकी बहीण आणि दादा व ताईचं रक्षाबंधन महाराष्ट्रात चर्चेचं केंद्र बनलं होतं. ताई म्हणाली ‘आधी लगीन कोंडाण्याचं’ आणि दादा म्हणाले मुंबईत असेन तर बांधून घेईन. दरम्यान महायुती सरकारनं दिला शब्द खरा करत लाडक्या बहिणीच्या बॅंक खात्यात रक्कम जमा केली आणि बॅंकात रक्कम काढायला आणि भावांना राखी बांधायला एकच झुंबड उडाली. राखी बांधून घ्यायला नेत्यांना दोन हात कमी पडावेत आणि बॅंकात पाय ठेवायला जागा नसावी अशी स्थिती निर्माण झाली हे रक्षाबंधन कुणी कुणासाठी केले हे समजून घेतले पाहिजे. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राची पूजा करून मासेमारीला सुरवात करतात. आता राजकीय मंडळीही मतमारिला प्रारंभ करतील, जातदांडगे, धनदांडगे यांची जाळी मतमारीत महत्त्वपूर्ण ठरते. आता हे दांडगे घटनेच्या नावाने गळा काढत स्वत:च सत्ताधीश होऊ पहात आहेत. महाराष्ट्रात संख्येने मोठ्या असलेल्या मराठा समाजाने सर्व 288 जागा लढवण्याचा निर्धार केला असून सर्वत्र अपक्ष उमेदवार उभा करायचे आणि आपली मागणी आपणच सत्ताधारी होऊन हिसकावून घ्यायची, प्रसंगी मनोज जरांगे यांनाच मुख्यमंत्री करायचे असा पवित्रा घेतला आहे. पण या निर्णयाने महायुती बरोबरच महाआघाडीचाही रोख बदलताना दिसतो आहे. अलीकडे अजितदादांच्या भाषेत फरक पडला आहे. सुप्रिया विरुद्ध तीच्या वहिनीला उभे केले ही चूक झाली अशी जाहीर कबुली अजितदादांनी दिली आहे. अजितदादांच्या मेळाव्याच्या पोष्टरवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब झालेने भाजपाने काळे झेंडे, निदर्शने, निषेध घोषणा असा पवित्रा घेतला आहे. महायुती तुटते का? अशी स्थिती आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठोपाठ दोनवेळा घेतलेली भेट काही शिजतय असं निदर्शनास येण्यासाठी पुरेशी ठरली आहे. महाआघाडीत संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. विदर्भात संजय राऊत विरुद्ध नितीन राऊत जुंपली आहे. भाजपात काय चाललंय हे सारेच गौडबंगाल आहे. निवडणूक घोषणा होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. आणि आता चर्चा राज्यपाल नियुक्त बारा उमेदवार आणि मंत्रीमंडळ विस्ताराची सुरु आहे. जोडीला देवेंद्र फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असे मानले जात आहे. भाजप आणि संघ यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी पडलेले अंतर भाजपाला महागात पडले असे मानून भाजप व संघ पातळीवर नवी पावले टाकली जात आहेत. संघाचे एक ज्येष्ठ विस्तारक लिमये यांनी मुंबईत भाजपच्या काही नेत्यांशी दोन बैठका केल्या त्यांच्या ज्या वार्ता प्रसारमाध्यमापर्यंत पोहचल्या, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस या कट्टर स्वयंसेवकास भाजप अध्यक्ष करायचे असे घाटत आहे. कदाचित या बातम्या पेरल्या पण गेल्या असतील. तूर्त महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय परिस्थिती बघून जो तो पवित्रा घेतो आहे. रक्षाबंधन झाले असले तरी कोलकत्यात झालेली घटना किंवा महाराष्ट्रात झालेल्या घटना पाहता महिला गर्भापासून उच्च पदापर्यंत कुठेही महिला सुरक्षित नाही हे अधोरेखित होते आहे. कोणतेही सरकार असले तरी यात फरक पडत नाही, ही चिंतेची बाब आहे. बदलापूरमधील वातावरण तप्त आहे. तेथे चिमुरडीवर झालेले अत्याचार त्यावर संतप्त झालेला जनसमुदाय, जमावाने शाळेची केलेली मोडतोड व रेल्वेस्थानकावर केलेली चाल हे रक्षाबंधनापाठोपाठ पुढे आलेले वास्तव आहे.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एकतर्फी प्रकरणातून सुस्वरूप युवतीची हत्या झाली होती. मुख्यमंत्री दर आठवड्याला एक खटला सरकारी विशेष वकील उज्ज्वल निकम यांचेकडे सोपवत आहेत. रक्षाबंधनाचे राजकारण होते आहे पण रक्षाबंधनाचे संस्कार कमी पडत आहेत. आधी राजकारण की आधी समाजकारण यावरही आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. अन्यथ: राजकारणाचा चिखल आणि सामाजिक, जातीय विद्वेष वाढून महाराष्ट्र कोसो मैल मागे फेकला जाईल. या साऱ्या वातावरणात ओघानेच अशांतता, अस्थिरता, आरोप प्रत्यारोप यांना भरती येते आहे. आगामी गौरी गणपतीचा सण आणि त्या निमित्ताने होणारे राजकारण कोणत्या थराला जाईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. बांगलादेशामधील परिस्थिती तेथे हिंदू समाजावरचे हल्ले, यामुळेही जागतिक स्तरावर सर्वांचे लक्ष लागले आहे. चिंता व संताप व्यक्त होत आहे. भारत कोणती कारवाई करतो हे बघावे लागेल पण या निमित्ताने बंद, निषेध सर्वत्र सुरु झाले आहेत. महाराष्ट्रातील मुस्लिम बांधव लोकसभा निवडणुकीत आणि नंतरही एकगठ्ठा कॉंग्रेस व शिवसेनेबरोबर राहीले असे स्पष्ट चित्र दिसून आले. उद्धव ठाकरे आता आपली नवी भूमिका घेताना गळ्यात कॉंग्रेस गमले अडकवून घेताना आणि मुस्लिम मतपेटीसाठी वक्तव्ये करताना दिसत आहेत. त्यांची बदलती भूमिका त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर आरुढ करणार का हा सवाल आहे पण ठाकरे यांनी आधी महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा असा आग्रह धरलेला आहे. त्यासाठी दिल्लीवारी करुन कॉंग्रेस नेत्यांचे उंबरठे झिजविले आहेत. पण कॉंग्रेस हायकमांड ठाकरे व शरद पवारांना पूरती ओळखून आहे. कॉंग्रेसच्या दरबारी राजकारणात मित्रपक्षांच्या अशा लॉबिंगला दाद मिळत नाही. शिवसेनेचा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात फारसा चांगला स्ट्राईकरेट दिसला नव्हता, महाआघाडीचे तिकीट वाटप नेमके झाले असते तर आणखी फरक पडला असता. कदाचित दिल्लीत सत्तांतर झाले असते, असे घटक पक्षांच्या नेत्यांना वाटते आहे. त्यामुळे महाआघाडीत शिवसेनेला मनमानी वा फ्रीहँड मिळणार नाही हे स्पष्ट आहे. शिवसेनेला मोठा भाऊ मानायला आघाडी तयार नाही. असाच या साऱ्याचा अर्थ आहे. आपली पारंपरिक मुस्लिम व्होट बॅंक शिवसेना हिसकावून घेईल अशीही भीती कॉंग्रेस नेत्यांना आहे. ओघाने महाआघाडीत महायुतीप्रमाणेच सर्वकाही ऑलवेल नाही. दिवाळीनंतरच महाराष्ट्रात निवडणुका होणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यातील सामाजिक, राजकीय परिस्थिती बघून कदाचित राष्ट्रपती राजवटही येऊ शकते. एकुणच राजकीय सारीपाटावर नव्यानेच डाव सुरु केला जाईल अशी चिन्हे आहेत. मनसे नेते राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर निघाले आहेत. महाराष्ट्रात आरक्षण गरजेचे नाही ही टॅग लाईन घेऊन राज्यात झालेला राजकीय चिखल तुडवत ते महाराष्ट्र माझ्या ताब्यात देऊन बघा असे आवाहन करत आहेत. शरद पवारांच्याजातीय राजकारणावर राज ठाकरे यांचे लक्ष आहे. सीमाभागातील भगिनींनाही लाडकी बहीणचे लाभ द्या, या मागणीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुणीही अद्याप तोंड उघडलेले नाही. यातच या योजनेचा हेतू दिसतो आहे. एकुणच राजकारण कुस बदलतांना, नवा सारीपाट, नवा डाव मांडताना दिसत आहे.








