योजनेच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल अशक्य : नव्या भाडेकरुंना फायदा नाहीच
बेळगाव : घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यासाठी राज्य सरकारने गृहज्योती ही महत्त्वाकांक्षी योजना मागील वर्षभरापासून सुरू केली आहे. परंतु, नव्या भाडेकरुंना या योजनेचा फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. भाडेकरूने घर रिकामे केल्यानंतरही त्याला मिळत असलेला गृहज्योतीचा लाभ त्यांच्याच आधारकार्डमुळे सुरूच असून नव्या भाडेकरूंच्या पदरात काहीच पडत नाही. गृहज्योती योजनेचा लाभ घरमालकांसोबतच भाडेकरुंनाही देण्यात आला. मीटर क्रमांकावर नोंदणी केलेल्या भाडेकरूला गृहज्योतीचा लाभ देण्यात आला. परंतु, आता भाडेकरुंना नवीन समस्या येत आहे. घर बदलल्यानंतर नवीन ठिकाणी रहायला गेल्यानंतर तेथील जुन्या भाडेकरुंच्या आधारक्रमांकावर नोंदणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.भाडेकरुला आधारक्रमांक बदलण्याची सुविधा गृहज्योतीच्या सॉफ्टवेअरमध्ये नाही. त्यामुळे नवीन भाडेकरुंना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
लाखो नागरिक योजनेपासून वंचित
घरातील प्रत्येक मीटरला आधार क्रमांक दिला असून, त्या आधार क्रमांकावर आधार लिंक असणाऱ्या व्यक्तीलाच गृहज्योतीचा लाभ मिळतो. परंतु, आधार क्रमांक बदल करण्याचा प्रयत्न केल्यास तो बदल होत नाही. त्यामुळे जुन्या भाडेकरुपेक्षा अधिक वीज वापरल्यास अतिरिक्त बिल भरावे लागत आहे. बेळगाव हे एक मोठे शहर असल्यामुळे भाडेकरुंची संख्याही लाखोच्या घरात आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना या योजनेपासून दूर रहावे लागत आहे.
सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे गरजेचे
राज्य सरकारने गृहज्योतीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे गरजेचे आहे. भाडेकरुंना स्वतंत्र यंत्रणा देऊन आधार क्रमांक बदलण्याची संधी देणे गरजेचे आहे. नवीन कनेक्शनसाठी पत्नी अथवा मुलाचा आधार क्रमांक वापरून योजनेचा लाभ मिळवता येत असला तरी जुन्या मीटरवर हा लाभ घेता येत नाही.









