आयसीसीने केला लाँच : विडीज व अमेरिकेत होणार स्पर्धेचे आयोजन
वृत्तसंस्था /दुबई
आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या पुरुष आणि महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या नवीन लोगोचे अनावरण केले आहे. पुरुष स्पर्धा 4 जून ते 30 जून 2024 या कालावधीत वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार आहे. तर महिला टी-20 वर्ल्डकप बांगलादेशमध्ये होणार आहे. तारखा आणि वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे घोषित केले गेले नसले तरी आयसीसीने लोगोच्या अनावरणासह आता दोन्ही मेगा इव्हेंटची तयारी सुरु केल्याचे चित्र दिसत आहे. आयसीसीने या नव्या लोगोचे अनावरण करताना सर्वांसाठी एक खास संदेश तयार केला आहे. सर्वांच्या नजरा अमेरिका आणि वेस्ट इंडिजवर आहेत. अवघे काही महिने या वर्ल्डकपसाठी राहिले असून सर्व संघ या स्पर्धेच्या तयारीसाठी लागले आहेत. दरम्यान, आयसीसीने आगामी स्पर्धेशी संबंधित एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आगामी स्पर्धेच्या लोगोची माहिती देण्यात आली आहे. टी-20 वर्ल्डकपचा हा नवीन लोगो क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये वेगाने बदलणाऱ्या घटनांना प्रतिबिंबित करतो. हा लोगो नवीन उर्जा तयार करतो. या लोगोमध्ये लिहिलेल्या टी-20 शब्दाची अक्षरे एका डिझाईनमध्ये लिहिलेली आहेत, ज्यामध्ये बॅटचा स्विंग दिसून येतो ज्यावर चेंडू खूप वेगाने आदळला आहे. ही तीन अक्षरे झिगझॅग पॅटर्नच्या रचनेत शेजारी शेजारी ठेवली आहेत. ज्यातून बॅट आणि बॉल यांच्यातील स्ट्राईकमुळे निर्माण होणारी कंपने आणि प्रचंड ऊर्जा दिसून येते.









