तीन विषयातून एमएससी चालू करणारे पहिलेच कॉलेज : तपासणी समितीने दिलेल्या अहवालानुसार कॉलेजलाही मान्यता
प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटी संचलित जीएसएस कॉलेजमध्ये 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून सुक्ष्म जीवशास्त्र, पर्यावरण विज्ञान आणि जीव रसायनशास्त्र या विषयातून एमएससी अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे या तीन विषयातून एमएससी चालू करणारे हे पहिलेच कॉलेज आहे. या आधी या कॉलेजमधून रसायनशास्त्र, वनस्पती शास्त्र, प्राणी शास्त्र, भौतिक शास्त्र या विषयातून एमएससी अभ्यासक्रम शिकता येत होता. नुकत्याच झालेल्या अधिकृत तपासणी समितीने कर्नाटक सरकारला दिलेल्या अहवालानुसार कॉलेजलाही मान्यता देण्यात आली.
या अहवालानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमाला उपयुक्त असलेल्या सर्व सोयी सुविधा या कॉलेजमध्ये उपलब्ध असून, जीएसएस कॉलेजमध्ये पीयूसी ते एमएससी अभ्यासक्रम शिकविला जातो. हे नवीन अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे बेळगाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. जीव रसायनशास्त्र विभागातून एमएससी करणाऱया विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये संशोधक म्हणून काम करता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
तसेच पर्यावरण, संरक्षण, कृषी आणि अन्य विभाग, फॉरेन्सिक सर्व्हीस आणि वैधानिक सल्लागार म्हणून काम करता येईल तर सुक्ष्म जीवशास्त्र व पर्यावरण विज्ञान या विषयातून एमएससी करणाऱयांना संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ, पर्यावरण व्यवस्थापक, पर्यावरण सल्लागार, प्रदूषण नियंत्रण मंडळ याचबरोबर इको टूरिझम, वन आणि जैव विविधता विभागातून पर्यावरण आरोग्य सुरक्षा अधिकारी म्हणून नोकरी मिळू शकते. या कोर्सच्या अधिक माहितीसाठी जीएसएस कॉलेजच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









